राज्याचा अर्थसंकल्प आरोग्य व कृषी क्षेत्रावर भर देणारा - माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - कोरोनाच्या सावटाखाली आज राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. गेल्या वर्षभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असल्याने राज्याच्या वार्षिक उत्पनात मोठी तूट झाली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर, आरोग्य आणि कृषी क्षेत्राला झुकते माप देण्यात येईल, असा अंदाज तज्ज्ञांनी बांधला होता. त्या अंदाजाप्रमाणे अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्षात आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर लक्ष देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे मत कृषी तज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत अर्थसंकल्प सादर झाल्याने आर्थिक टंचाई नक्कीच आहेत. राज्य सरकारचा अर्थसंकल्प फारसा दिलासा देणार नसला तरी तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. याचे स्वागत शरद निंबाळकर यांनी केले आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांचा विकास करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. हा निर्णय देखील शेती क्षेत्राच्यादृष्टीने अतिशय चांगला असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. एकंदरीत कृषी विभागाने स्वागत करावा असा हा अर्थसंकल्प असल्याचे मत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.