उसाच्या फडाला लागली आग, दोन शेळ्यांसह शेतकरी आगीत होरपळून ठार

March 08,2021

सांगली : ८ मार्च - सांगलीच्या  आष्टा  येथील सोमलिंग तळ्याजवळ उसाच्या फडाला अचानक आग लागून झालेल्या घटनेत शेळ्यांना वाचविण्यासाठी गेलेला शेतकरी  आगीत होरपळून ठार झाला. तसंच या आगीने दोन शेळ्यांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी रामचंद्र चव्हाण (वय 64)असं या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून या घटनेत दोन शेळ्याही होरपळून मयत झाल्या. भर दुपारी ही घटना घडल्याने शेतकरी तसंच शेळ्यांना वाचविता आले नाही.

इकबाल बाबासो इनामदार यांचे आष्टा येथील सोमलिंग तलावाजवळ शेत आहे. या शेतात सुमारे अर्धा एकर ऊस आहे. दुपारच्या सुमारास उसाच्या फडास अचानक आग लागली. यावेळी मयत शिवाजी चव्हाण हे शेळ्या राखण्यासाठी आले होते. त्यांच्या दोन शेळ्या आग लागलेल्या उसाच्या फडात शिरल्या होत्या. या शेळ्यांना वाचविण्यासाठी शिवाजी चव्हाण हे उसाच्या फडात शिरले.

उन्हाच्या तडाख्याने उसाच्या फडाची आग वाढत चालली होती. या फडात शेळ्यांना वाचविण्यासाठी शिरलेले शिवाजी चव्हाण आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यांना आगीने चोहोबाजूंनी घेरल्याने उसाच्या फडाच्या बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीने होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तसंच या आगीत दोन शेळ्यांही होरपळून ठार झाल्या.

शिवाजी चव्हाण यांच्या पश्चात एक मुलगा सून व नातवंडे  आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन वीस वर्षापूर्वी अल्पशा आजाराने झाली होते. त्यांच्याकडे एकूण पंधरा ते सतरा शेळ्या आहेत. ते आष्टा येथील उमाजी हाऊसिंग सोसायटी येथील रहिवासी असून ते लहानपणापासून शेळ्या चारण्याचे काम करत होते. य घटनमुळे गावात हळहळ व्यक्त केली.