वर्चस्वाच्या लढाईसाठी चालला १५ तास लिलाव

March 08,2021

जयपूर : ८ मार्च - एखादी वर्चस्वाची लढाई असेल तर ती लढाई जिंकण्यासाठी मनुष्य हा हट्टाला पटतो. हे वर्चस्व घरच्या व्यक्तींवरच गाजवायचं असेल तर त्यामधून अगदी युद्धासारखे अनर्थ होतात याला आपल्या देशाचा इतिहास याचा साक्षीदार आहे. ऐतिहासिक काळापासून सुरु असलेला हा संघर्ष अगदी आजच्या काळातही जग कितीही बदललेलं असलं तरी सुरु आहे.

राजस्थानमध्ये  सध्या दारुच्या दुकानांचा  लिलाव सुरु आहे. हनुमानगड जिल्ह्यातील कुईआ गावामध्ये दारुच्या दुकानांच्या एका लिलावामध्ये अगदी रेकॉर्ड ब्रेक बोली लागली आहे. वृत्तानुसार 72 लाख रुपयांपासून सुरु झालेली ही बोली सतत वाढत होती.

सरकारी अधिकाऱ्यांसाठी ही फक्त एका दारुच्या दुकानाची बोली होती. मात्र या लिलावात बोली लावणाऱ्या एकाच परिवारातील दोन महिलांसाठी ती वर्चस्वाची लढाई होती. त्यामुळे सकाळी 11 वाजता सुरु झालेली ही बोली 12 तास उलटले तरी संपत नव्हती. अखेर तब्बल 15 तासांनी म्हणजे रात्री 2 वाजता 510 कोटी रुपयांच्या बोलीवर हा लिलाव समाप्त झाला.

एका दारुच्या दुकानासाठी इतकी बोली लागली यावर आबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. मागच्या वेळी या दुकानासाठी 65 लाखांची बोली लागली होती. यावेळी कोरोना व्हायरस  संसर्गानंतर आलेल्या मंदीचा कोणताही फटका या लिलावाला बसला नाही.

या लिलावाच्या विजेत्या किरण कंवर यांना दोन दिवसांमध्ये एकूण बोलीच्या 2 टक्के रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विजेत्यानं या दुकानाची खरेदी प्रक्रीया पूर्ण केली नाही तर त्याचे नाव काळ्या यादीमध्ये टाकले जाईल असंही सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.