दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या त्रिकुटाला अटक

March 08,2021

नागपूर : ८ मार्च - रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटणार्या एका त्रिकुटाला अटक करून त्यांच्या ताब्यातून 4 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. प्रणय संजय ठाकरे (20) खामला जुनी वस्ती, रोहित रविदास डोंगरे (20) देवनगर आणि दिनेश इंद्रपाल निंबोने (25) प्रतापनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

खापरी येथील नवीन पुनर्वसन येथे राहणारे जितेंद्र बाबुलाल मलिक (35) हे एम्समध्ये हाऊस किपिंगचे काम करतात. 2 मार्च रोजी मध्यरात्री मलिक हे ड्युटीवरून घरी येत होते. रस्त्याने येत असताना अचानक त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे दुचाकी ढकलत ते घरी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून तीन लुटारू आहे. लुटारूंनी मलिक यांना लिफ्ट देऊन त्यांच्या दुचाकील टोचन लाऊन खापरी येथील पेट्रोलपंपावर नेले. पेट्रोलपंपावर लुटारूंनी मलिकच्या दुचाकीत पेट्रोल भरले. मलिकने पैसे देऊन दुचाकी मागितली असता लुटारूंनी त्यांना हातबुक्कीने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्यांची दुचाकी, मोबाईल, रोख 6 हजार रुपये इतर कागदपत्रे असा 38 हजाराचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. 

पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता लुटारू हे वर्धेकडे पळून गेल्याचे लक्षात आले. पोलिसांचे एक पथक लगेच वर्धेला रवाना झाले. पोलिसांनी पुलगाव येथून तीनही आरोपींना आणि त्यांच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त मुलाला ताब्यात घेतले. या लुटारूंनी सोनेगाव, प्रतापनगर, तहसील आणि बेलतरोडी येथून 2 दुचाकी अशा 5 दुचाकी लुटल्या होत्या. लुटारूंजवळून पाच दुचाकी आणि 9 मोबाईल असा 4 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली. ही कामगिरी पो. नि. विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया, हे. कॉ. तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, विजय श्रीवास, गोपाल देशमुख, बजरंग जुनघरे, नितीन बावणे, कुणाल लांडगे यांनी केली.