गडचिरोली तालुक्यात पोलिसांनी दोन दारूअड्डे केले उध्वस्त

March 08,2021

गडचिरोली : ८ मार्च - गडचिरोली तालुक्यातील मेंढा अलोणी जंगलपरिसरात गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्त कारवाई करीत दोन दारू अड्डे उद्धवस्त केले आहे. सोबतच दारूविक्रेत्यांनी टाकलेला ९ क्विंटल मोहसडवा नष्ट केला आहे. अलोणी या मुजोर गावातील दारूविक्रेत्यांविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाई केल्याने परिसरातील दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. 

मेंढा, अलोणी या गावात दारूचा महापूर आहे. अलोणीत ३0 ते ४0 दारूविक्रेते सक्रिय आहेत. या गावाच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. झगडे-भांडणांचे प्रमाण अधिक झाले आहे. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. 

गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या अलोणी येथील जंगलपरिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगलपरिसरात शोधमोहीम राबवत दोन दारू अड्डे उद्धवस्त केले. तसेच विविध ठिकाणी टाकलेला धाडीत ६३ हजार रुपये किंमतीचा ९ क्विंटल मोहसडवा नष्ट केला. यामुळे दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने अँक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरु आहे. मुजोर गावातील दारूविक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील दारूविक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार प्रभाकर भेंडारे, हवालदार शकील सय्यद, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकूडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेर्शाम यांनी केली.