८ वर्षांपासून गुंगारा देणारा कुख्यात गुंड पोलिसांच्या जाळ्यात

March 05,2021

नागपूर : ५ मार्च - कान्हान येथील कुख्यात गुंड जयसिंग यादव याला नागपूरच्या आकाशवाणी चौकात नागपूर ग्रामीण पुलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे. गेल्या ८ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. या कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. जयसिंग यादव हा आकाशवाणी चौकातील एका चहाच्या  टपरीवर थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जीट्टावार  यांना मिळाली या माहितीच्या आधारे सापळा रचून जयसिंगाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ८ एप्रिल २०१३ पासून जयसिंग यादव व कुख्यात गुंड मोनीश रेड्डी यांच्यात टोळीयुद्ध सुरु आहे. जयसिंगने मोनिशवर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणात योगेश यादव राजा यादव विपीन गोंदाने जयसिंग यादव उमेश भोयर जीवन ठवकर  प्रशांत येलेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.  जयसिंगने कायद्याच्या कचाट्यातून पळ काढून उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला होता त्याने पोलीस तपासात कुठलेही सहकार्य केले नाही  व पोलिसांसमोर हजर झाला नाही त्यामुळे त्याचा अंतरिम जमीन उच्च न्यायालयाने खारीज केला होता.  ही माहिती त्याला मिळताच तो फरार झाला गेल्या आठ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होती  आज अखेर त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले.