पंतप्रधानांच्या आवाहनाला देशवासियांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद... दिल्ली ते गल्ली नागरिकांनी अंधार करुन केले दीपप्रज्वलन

April 05,2020

देशातील मोदीविरोधकांनी केलेल्या विरोधी प्रचाराला दाद न देता आज भारतभरातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिल्ली ते गल्ली करोडो नागरिकांनी आज रात्री ठीक ९ वाजता आपल्या घरातील लाईट्स मालवून घराच्या बालकनीत येत दिवे, मेणबत्त्या, टॉर्च आणि मोबाईलचे लाईट उजळून कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी संपूर्ण देशातील जनता एक असल्याचा संदेश दिला.....

कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी आम्ही एक आहोत हा संदेश देण्यासाठी आज रात्री ९ ते ९.०९ पर्यंत देशवासियांनी आपापल्या घरातील लाईट्स मालवून दिवे लावावे आणि तिमिरातून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला आज देशवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राजधानी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविद , पंतप्रधान मोदी आणि मंत्रीमंडळातील इतर मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, आणि सामान्य नागरिकांनी आज आपापल्या निवासस्थानी दीपप्रज्वलन केले. काही उत्साही नागरिकांनी यावेळी फटाके देखील फोडले. अनेकांनी आपल्या बालकनीत उभे राहून शंखनाद करुन, प्रकाशाचे मंत्र म्हणून आणि टाळ्या वाजवून आम्ही एक असल्याचा निर्वाळा दिला....

दिल्लीसह देशातील सर्व राज्यांच्या राजधान्या आणि प्रमुख शहरांमध्ये असाच उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे दिसून आले. मुंबईत स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी त्यांचे बंधू ह्रदयनाथ, बहिण उषा यांच्यासह कुटुंबिय, राजकीय पक्षांचे नेते चित्रपट जगतातील सेलेब्रिटी, उद्योगपती या सर्वांसह सामान्य नागरिकांनी देखील आपला सहभाग नोंदवला. घरातील लाईट्स मालवून  बालकनीत दिवे लावलेले असल्याने अंधारात मिणमिणत्या असंख्य दिव्यांचे दृश्य अत्यंत विहंगम दिसत होते. पुण्यासह इतर शहरातही हाच प्रतिसाद होता. अनेक मंदिरात यावेळी मंत्रगजर करण्यात आला.

नागपुरात देखील मान्यवरांसह सामान्य नागरिक देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. डॉ विकास महात्मे, माजी खा. अजय संचेती, महापौर संदीप जोशी, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले प्रभृतींसह मान्यवर आणि सामान्यांनी आपला सहभाग नोंदवत एकतेचा निर्धार व्यक्त केला...