कोरोनामुळे फुलंबागाही कोमजल्या

April 05,2020

नागपूर, 5 एप्रिल -  देवालये, लग्न समारंभ, वाढदिवस आदी सर्व प्रकारच्या कार्यक्रमात फुले आणि फुलांच्या सुगंधाच्या दरवळीला कोरोना विषाणूंचा मोठा फटका बसला आहे. विविध फुलांची विक्रीच जवळपास बंद झाल्याने फूल उत्पादक  शेतकर्‍यांवर मोठे संकट कोसळले आहे. एरवी फुलांच्या सजावटी आणि फुलांच्या सुगंधाची दरवळ कोरोना विषाणूंच्या धास्तीने हरपली आहे.

फुलांचे मळे बहरले आहेत, मात्र फुलांची मागणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हरितगृहातील जरबेरा, गुलाब उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. हरितगृहातील गुलाबाची फुले बाजारात सध्या जात नसली तरी ती दररोज  फुले तोडून फेकावी लागत आहे. त्यामुळे मजुरी, दररोज झाडांना पाणी, खते, औषधे हा खर्च करावाच लागतो. एकरभर हरितगृहातील महिना दोन ते अडीच लाख रुपये खर्च होत असतो. होणारा तोटा सहन करून गुलाबाची झाडे  टिकवून ठेवावी लागत आहे.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांनी फुल शेतीसाठी हरितगृहे बांधली आहेत. त्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूकही केली आहे. एरव्ही या फुलांना जशी देशात बाजारपेठ आहे तशीच परदेशातही प्रचंड मागणी आहे. विमानाने  आखाती देशात दररोज करोडो फुले पाठविली जातात. मात्र सध्या कोरोनामुळे वाहतूक बंद आहे त्यामुळे फुले बगिच्यातच सुकत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये झेंडूने बहरलेले ताटवे वाळल्यामुळे शेतकर्‍यांनी तोडून टाकलेले दिसून आले.  आतापर्यंत झाडे जगवणे आणि वाढवणे यावर झालेले सर्व खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.