संजय राठोड उद्या माध्यमांशी बोलतील काय? - नागरिकांमध्ये उत्सुकता

February 22,2021

यवतमाळ : २२ फेब्रुवारी - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट आरोप केलेले वन मंत्री संजय राठोड आज यवतमाळला येणार आहेत. यवतमाळमध्ये आज मुक्काम करून उद्या ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज राठोड यवतमाळला आल्यावर मीडियाशी बोलणार का? या विषयची उत्सुकता लागली आहे. 

पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आत्महत्येबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. 12 कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही शंका अधिकच बळावली होती. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपने नाव घेतले होते. त्यानंतर गेले पंधरा दिवस राठोड हे गायब आहेत. त्यांनी या प्रकरणावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. या प्रकरणात होणारे आरोपही त्यांनी फेटाळून लावलेले नाहीत किंवा मंत्रालयीन कामकाजात भागही घेतला नाही. त्यामुळे राठोड यांच्या भोवतीचं गूढ अधिकच वाढलं आहे.

त्यातच दोन दिवसांपूर्वी पोहरादेवीच्या महंतांनी राठोड हे मंगळवारी सहकुटूंब पोहरादेवीला येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार ते आज यवतमाळ येथील आपल्या घरी येतील. घरी आल्यावर उद्याच्या पोहरादेवी दौऱ्याबाबत ते चर्चा करतील. त्यानंतर उद्या पोहरादेवीला जाऊन देवीचं दर्शन घेतील. यावेळी ते मीडियाशी संवाद साधण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राठोड काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.