माजी उपमहापौरांनी जागेचा वाद मिटवण्यासाठी महिलेला केली शरीरसुखाची मागणी

February 22,2021

चंद्रपूर : २२ फेब्रुवारी - माजी उपमहापौर व भाजपचे विद्यमान नगरसेवक संदीप आवारी यांनी जागेचा वाद मिटविण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली आहे, असा धक्कादायक आरोप एका महिलेने पत्रकार परिषदेत केला.

या महिलेचा जागेचा वाद सुरू आहे. या महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या नावाने ही जागा असताना वंदना वानखेडे आणि गंगाधर वानखेडे यांनी त्यांच्या या जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यांना स्थानिक नगरसेवक संदीप आवारी यांची साथ आहे. हे प्रकरण सोडविण्यासाठी ती नगरसेवक आवारी यांच्याकडे गेली असता त्यांनी शरीरसुखाची मागणी केली. जर तू माझी मागणी मान्य केली तर तर त्रास देणाऱ्या सर्व लोकांना मी हटवतो. मात्र, या महिलेने ही मागणी फेटाळून लावत रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी यावर कुठलीही करवाई केली नाही. केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. याच्या काही दिवसांतच या महिलेच्या घराची भिंत पाडून बांधकाम करण्यात आले. याविरोधात महिलेने महानगरपालिका आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. या महिलेची आई मरण पावल्यानंतर या महिलेच्या नावाने जागा करण्यात आली. या महिलेकडे जागेच्या मालकीचा भोगवटदार प्रमाणपत्र आहे. मात्र, नगरसेवक आवारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. जबरदस्ती अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देत आहे. गुंड पाठवून धमकावत आहेत. या विरोधात पाच तक्रारी करूनही प्रशासन काहीच करत नाही आहे, असा आरोप या महिलेने केला आहे. या महिलेचा भावावर आपल्याच वडिलांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याला तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तो देखील माझ्या विरोधात आहे. नगरसेवक आवारी यांची पोलीस निरीक्षक हाके यांच्याशी संगनमत आहे. महापालिका अधिकारी आणि सहायक आयुक्त विद्या पाटील देखील यात सामील आहेत. मी एकटी महिला असल्याने सर्व लोक मला भीती घालत आहेत. जर माझे काही बरे-वाईट झाले तर याची सर्व जबाबदारी नगरसेवक संदीप आवारी, वंदना वानखेडे, गंगाधर वानखेडे, पोलीस अधिकारी आणि महिलेचे अधिकारी जबाबदार असतील असे म्हणत पोलीस संरक्षण देण्याची मागणी या महिलेने पत्रकार परिषद घेऊन केला आहे.