प्रदूषणामुळे चंद्रपूरच्या रामाळा तलावात माशांचा मृत्यू

January 27,2021

चंद्रपूर : २७ जानेवरी - चंद्रपुरातील एकमेव ऐतिहासिक व गोंडकालीन रामाळा तलावात एव्हाना मासे तडफडून मरत आहेत. वाढत्या प्रदुषणामुळे मासे मृत्यूमुखी पडत असल्याचा आरोप इको-प्रो संघटनेने केला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली आहे.

बुधवारी सकाळी इको-प्रोचे सदस्य रामाळा तलावाच्या काठावर असताना सभोवताल पाण्यात मृत मासे तरंगताना आढळून आले. काठावरील कचर्यामुळे तसेच इकोर्निया वनस्पती असल्याने बरेच मृत मासे दिसले नाहीत. मात्र, अनेक मासे मृत्यमुखी पडत आहेत. बुधवारी फक्त विसर्जन स्थळावर पाहणी केल्यानंतर बरीच मासे मृत झालेली आढळून आली. कायम तलावात येणारे सांडपाणी, जे मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येत असते, त्यामुळे तलावाच्या प्रदुषणात वाढ होवून जलजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. सोबतच भुजलसुध्दा दुषित होत आहे. तलावाच्या काठावर पाण्यास सुटलेल्या दुर्गंधीमुळे हवा जोरात असेल, तेव्हा परिसरात हा दुर्गध पसरत असतो, त्याचा नागरीकांना त्रास सहन करावा लागतो, अशीही तक्रार इको-प्रोने केली आहे.

गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी तलाव खोलीकरणाबाबत बैठका घेतल्या होत्या. 

त्यात इको-प्रोने तलाव संवर्धनासाठी सुचविल्याप्रमाणे, तलाव सुकवून खोलीकरण करणे, अतिक्रमण रोखण्यास सुरक्षा भिंत बांधणे, मच्छीनाला दुसरीकडे वळता करणे, नाल्यावर जलशुध्दीकरण संयत्र उभारणे, तलावात वेकोलिचे वाया जाणारे पाणी वाहिनी टाकून तलावात शुध्द पाणी आणणे यावर चर्चा झाली होती. यानुसार वेकोलिचे पाणी तलावात आणण्याचे काम वेकोलिकडून करण्यात येत आहे. खोलीकरणास सुरूवात करण्यात आली. मात्र, पावसाला सुरूवात झाल्याने प्रत्यक्ष कामाची सुरूवात होवू शकली नाही आणि त्यापूर्वी कोविडमुळेसुध्दा तलावाच्या कामाकडे लक्ष देण्यात आले नाही.