काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

January 27,2021

अकोला : २७ जानेवारी - शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रातील मोदी सरकावर टीकेची झोड उठवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देणे आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणे ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची नौटंकी असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. मी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बारतीय जनता पक्षाला दोष देत नाही. ते दोषी आहेतच, मात्र या सर्वाची सुरुवात सन २००६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेच केली असे सांगत या दोन पक्षांनी कंत्राटी शेतीचा कायदा करून शेतकऱ्यांची ही अवस्था केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन नुसते शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून नाही, तर या देशाच्या फोर्स सेक्युरिटीचा प्रश्न या आंदोलनाच्या मार्फत त्यांनी त्यांनी उपस्थित केला आहे, असे आंबेडकर म्हणाले. या आंदोलनाने दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसाच्या जगण्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. मी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाला दोष देऊ इच्छित नाही. ते दोषी नाहीत असे नाही, ते दोषी आहेतच, पण याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने सन २००६ मध्ये केली आहे. त्यांनी कंत्राटी शेतीचा कायदा करुन याची सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने याचे उत्तर दिले पाहिजे असे आवाहन करतानाच तुमची नौटंकी कशासाठी चालू आहे?, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.

हा कायदा मुळात काँग्रेसचा आहे. एका बाजूला केंद्राने तुमचाच कायदा आणला. तुमचीच भूमिका केंद्र राबवत आहे. मग तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची बी टीम नाही का?... हा आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न तर नाही ना?... तुम्ही महाराष्ट्रातील कायदा रद्द का करत नाही?... असे एकावर एक प्रश्न उपस्थित करतानाच याचा अर्थ भाजपने आणलेल्या केंद्राच्या कायद्याला तुमचा विरोध नाही असा होतो असे सांगत आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, 'फक्त नौटंकी आणि तमाशा म्हणून तुम्ही या कायद्यांना विरोध करत आहात. जे पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत अशाच पक्षांच्या मागे लोकांनी राहावे. जातीच्या नावाने उभे राहिलात तर इथला शेतकरी उद्ध्वस्त होईल. याबरोबर दारिद्र्य रेषेखालील जगणारा माणूसही उद्ध्वस्त होईल, याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे.'