दोन अल्पवयीन मुलींवर केला अतिप्रसंग, रामटेकमध्ये गुन्हा दाखल

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - रामटेक येथील २९ वर्षीय आरोपीच्या पत्नीच्या वाढदिवसाला आईसह गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर आरोपीने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने रामटेक पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात एकच  खळबळ उडाली. 

आरोपीचे नाव धनंजय केशव खडसे (२९) रा. आझाद वार्ड रामटेक असे आहे. तर पीडित मुलींपैकी एकीचे वय १४ तर दुसरीचे १५ वर्षे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी व पीडितेच्या कुटुंब पूर्वी शेजारी-शेजारी किरायाच्या घरात राहायचे.  तसेच आरोपी व त्याची पत्नी व पीडितेची आई शेतमजुरीचे काम सोबत करायचे त्यातून दोन्ही कुटुंबातून चांगले संबंध  व ओळख  होती. १७ जानेवारीला आरोपीच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने पीडित मुलींसह आईला कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले. कार्यक्रमाच्या रात्री खूप उशीर झाल्याने आई व मुली तिथेच मुक्कामी थांबल्या. ओळखीचा फायदा घेत आरोपी धनंजयने  रात्री छोट्या बहिणीवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लहान बहीण व आई घरी निघून गेली.  मोठी बहीण तिथेच थांबले. परत आरोपीने पत्नीच्या नजरेआड मोठ्या बहिणीवर अत्याचार केला. ही  बाब तिने घरी आल्यावर  आईला सांगितली. लहान बहिणीनेसुद्धा आपलूंवर आरोपीने अशाचप्रकारे अत्याचार केल्याची आपबिती सांगितली. तत्काळ मुलीसह आईने रामटेक पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.  आरोपींविरुद्ध कलम ३७६ (३) अन्वये व बाललैंगिक  अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.