यंदाच्या प्रतिनिधी सभेत संघाचे सरकार्यवाह बदलणार काय?

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंदाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा  १९ व २० मार्चदरम्यान बंगळुरू येथील गुरूकुलम येथे  होणार असून प्रथमच सरकार्यवाहाची निवड नागपूरबाहेर होणार आहे. विद्यमान  सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतील कि त्यांच्या जागी इतर पदाधिकाऱ्यांची वर्णी लागते याकडे संघ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. २०२५ मध्ये संघ स्थापनेचे शताब्दी वर्ष असून, त्याअगोदर २०२४ च्या लोकसभा निवडणूकदेखील आहे. त्यामुळे या निवडीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान नव्या सरकार्यवाहाच्या नावांमध्ये विद्यमान सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.  

संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी  होत असते, परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणूक होतात. या सभेत सरकार्यवाह  (संघातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद) या पदाची निवड होणार आहे. एरवी देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी  या निवड प्रक्रियेत सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली ही सभा होत असल्याने १ हजार ४०० ऐवजी अर्धे किंवा तीन तृतीयांश प्रतिनिधींच्या उपस्थितीत सभा होईल. 

२०१८ मध्ये भैयाजी जोशी यांनी प्रकृतीच्या समस्येमुळे या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांच्याकडेच जबाबदारी सोपविण्यात आली होती. जोशी यांचे वय  ७३ वर्षे असून २००९ पासून ते या पदावर आहेत. 

विशेष म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात संघात तरुण स्वयंसेवकांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे यावेळीदेखील त्यांच्याकडेच जबाबदारी देण्यात यावी असे काही  संघधुरीणांचे मानणे आहे. 

परंतु गेल्या सहा वर्षात संघाने घेतलेले धोरण आणि संघप्रणीत संघटनांचे वाढते प्राबल्य यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येणाची शक्यता आहे.  तुलनेने तरुण असलेले सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी, व्ही. भागय्या, डॉ. कृष्णगोपाल, मुकुंद सी. आर. किंवा डॉ. मनमोहन वैद्य यांच्यापैकी एका नावाचादेखील विचार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत  आहे.  अंतस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांच्या नावाला सरसंघचालक  डॉ. मोहन भागवत यांच्यसह इतर वरिष्ठांनी शिक्कामोर्तब केले आहे. ६६ वर्षीय डॉ. मनमोहन वैद्य हे विज्ञानाचे  द्विपदवीधर असून त्यांनी विज्ञानातच डॉक्टरेट घेतली आहे. काही काळ नागपुरात प्राध्यापकी केल्यावर ते गुजरात मध्ये प्रचारक गेले. तेव्हापासून अनेक महत्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे. संघाचे दिवंगत विचारवंत प्रा. मा. गो. वैद्य यांचे ते चिरंजीव आहेत.