शिवसेना प्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाच निर्णय घ्या - देवेंद्र फडणवीस

January 20,2021

मुंबई : २० जानेवारी - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा केव्हाही व कधीही विरोध नाही, मात्र शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

ग्रामपंचायच निवडणुका पार पडताच वीजबिल थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याचा महावितरणचा निर्णय हा सरकारच्या विश्वासघाताचा नमुना आहे, अशी टीका करीत बिल्डरांच्या शुल्कसवलतीसाठी राज्य सरकारकडे निधी आहे, पण सर्वसामान्यांच्या वीजबिल सवलतीसाठी नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठका पार पडल्यावर रात्री पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नागपूरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयास शिवसेनाप्रमुख बालासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासह अनेक विषयांवर भाष्य केले.

गोंड, आदिवासी समाजाशी निगडित असल्याने या प्राणिसंग्रहालयास गोंडवना नाव देण्याची गोंड समाजाची मागणी होती व ती मान्यही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते.

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात  महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आंदोलन ही ढोंगबाजी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.