व्हाट्सअँपच्या धोरणावर केंद्र सरकारचे लक्ष - रविशंकर प्रसाद

January 20,2021

नवी दिल्ली : २० जानेवारी - व्हॉट्सऍपने गोपनीयतेच्या धोरणात केलेल्या बदलांवर केंद्र सरकारचे लक्ष आहे आणि वैयक्तिक संवादाचे पावित्र्य कायम ठेवणे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारने  स्पष्ट केले.

चीनमधील कंपन्यांसह आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून असलेला संभाव्य धोका पाहता देशाची सुरक्षा केंद्रस्थानी आहे, असे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी १२५ व्या इंडिया डिजिटल समिटला संबोधित करताना सांगितले.

व्हॉट्सऍप आपली पालक कंपनी फेसबुकला डाटा सामयिक करीत असल्याने त्याबाबत भारतासह जगभरातून टीकेची झोड उठली आहे. व्हॉट्सऍपच्या मंचावरून पाठवण्यात येणारे संदेश हे पाठवणार्याला आणि प्राप्त करणार्यालाच दिसतात. व्हॉट्सऍप किंवा फेसबुक खाजगी संदेश पाहू शकत नाही, असे व्हॉट्सऍपकडून वारंवार सांगितले जात आहे.

या मुद्यावर मंत्रालय काम करीत आहे आणि त्याचा प्रमुख म्हणून मी त्याबाबत वक्तव्य करू शकत नाही. मात्र, फेसबुक असो अथवा व्हॉट्सऍप, या कंपन्या भारतात व्यवसाय करण्यास मुक्त आहेत; परंतु तो भारतीयांचे अधिकार कायम ठेवून करावा. वैयक्तिक संदेशवहनातील पावित्र्य जपणे आवश्यक आहे. माझा विभाग कार्यरत आहे, हे लक्षात घेता मी फक्त तत्त्वांवर बोललो आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात सेवा देत असलेल्या चिनी कंपन्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आम्ही धोरणात्मक पद्धतीने काम करीत असल्याने मला कोणत्याही देशाचे नाव घेता येणार नाही. गोपनीयतेच्या धोरणामुळे आम्ही काही ऍप्सवर बंदी घातली आहे. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेसोबत आणि देशाच्या सार्वभौमत्वाचा आहे. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.