धानोलीमध्ये पोल्ट्री फार्म मधल्या १०२ कोंबड्या अचानक मृत

January 20,2021

वर्धा : २० जानेवारी - कारंजा तालुक्यातील धानोली येथील शेतकरी बुद्धेश्वर पाटील यांच्या शेतातील पोल्ट्रीफार्म मधील 102 कोंबड्याचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत कोंबड्याचे नमुने तपासणीला पाठवले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पक्षाच्या मृत्यू संख्या वाढत आहे. चार ते पाच ठिकाणी कुठे मोर तर कुठे पोपट आढळून आले.

काल सेलूमध्ये जंगल परिसरात आठ पक्षी मृतावस्थेत आढळून आले तर आज 19 रोजी कारंजा तालुक्यातील धानोली येथे पोल्ट्रीफार्म मध्ये 102 कोंबड्याचा मृत आढळून आल्या. बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने घटनास्थळी पशुसंवर्धन विभाग पोहचून त्यांनी पाच कोंबड्याचा शवविच्छेदन करून त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर नमुने भोपाळ येथे पाठविण्यात येणार आहेत. इतर कोंबड्यांना शेतात खड्ड्यात गाडण्यात आल्या आहेत. 

पशुसंवर्धन अधिकारी प्रवीण भिसे, प्रज्ञा डायगव्हाणे, मोहन खंडारे, मुकुंदा जोगेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. हिंगणघाट तालुक्यात काही दिवसांपूर्वी आठ मोर मृतावस्थेत आढळून आले होते. त्याचा अहवाल अद्यापही आला नसल्याने वर्ध्यात सध्या तरी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव नसल्याचे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात येत आहे.