पराभव सहन न झाल्याने महिला उमेदवाराने दिली महिला मतदारांना धमकी

January 20,2021

चंद्रपूर : २० जानेवारी - चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकाडो ग्रामपंचायतीत रिंगणात असलेल्या एका महिला उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव पचनी  न पडल्याने त्यांनी वॉर्डातील महिला मतदारांशी भांडण केले. शिवाय त्यांना धमकी दिली, अशी तक्रार महिला मतदारांनी घुग्घुस पोलिसात नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी उमेदवार रंजना झाडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मागील पंचवार्षिक निवडणुकीत रंजना झाडे या नकोडा ग्राम पंचायतच्या सदस्य होत्या. नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत झाडे यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे संतप्त या उमेदवाराने वॉर्डातील महिला मतदार अरूणा शिवदास सदाफळे व जयश्री विलास नगराळे या रस्त्यावरील किराणा दुकानात सामान घेत असताना त्यांच्याशी भांडण केले. तुम्ही मला मतदान केले नाही. माझ्याविरूद्ध दुसरा उमेदवार रिंगणात उतरविला, असे म्हणत धमकी दिल्याची तक्रार जयश्री नगराळे व अरूणा सदाफळे यांनी पोलिसात नोंदवली. पोलिसांनी तक्रारीवरून रंजना झाडे यांच्याविरोधात पोलिसांनी भादंवी 323, 504, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत.