काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची काहीच गरज नाही - यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेला भरला दम

January 17,2021

अमरावती : १७ जानेवारी - औरंगाबाद शहराच्या नामांतराचा वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. यावर काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेची चांगलीच कानउघडणी केली आहे. काँग्रेसला सेक्युलरीजम शिकवण्याची काहीच गरज नसल्याचे मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा असलेला विरोध पुन्हा पुढे आला आहे.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सामनामधील अग्रलेखाला जोरदार उत्तर दिले आहे. 'आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या कॉमन मिनीमम प्रोग्राममध्ये असलेल्या विषयावर काम करण्यास कटिबद्ध आहोत. आपली मते वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून यांचा खुलासा झाल्यानंतर पुढंच' असे असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

औरंगजेब सेक्युलर असल्याचा युक्तीवाद काँग्रेसकडून करण्यात आला होता. या युक्तीवादाला खोडण्यासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून काँग्रेसला टोला लगावला आहे. जर औरंगजेब कोणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. तसेच मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री ‘औरंगाबाद’ नाव असलेल्या शहराचे नामकरण संभाजीनगर व्हावे, यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये, या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्याने मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व परिणाम निवडणुकीच्यावेळी मुस्लीम मतांवर होईल. तसेच स्वतःच्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे विरोध करणारे उपस्थित करत आहेत. ते काहीही असले, तरी औरंजेबाच्या कोणत्याही खुना मराष्ट्रात दिसू नये, या मताचा मोठा वर्ग असल्याचे राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे.