विविध राज्यांना गुजरातला जोडणाऱ्या रेल्वेचा आज झाला शुभारंभ

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - देशातील विविध राज्यांना गुजरातला जोडणाऱ्या रेल्वेंचा आजपासून (17 रविवार) शुभारंभ झाला. या रेल्वेसेवांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशातील विविध 8 भागांमधून गुजरातच्या केवडीया रेल्वेस्थानकाला जोडण्यासाठी या विशेष रेल्वेसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेसेवांना हिरवा झेंडा दाखवला. मुंबईच्या दादरहूनदेखील केवडीयासाठी एक विशेष रेल्वेगाडी आजपासून धावणार आहे. या गाडीला नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या विविध 8 रेल्वेगाड्यांमुळे देशातील वेगवेगळे भाग गुजरातशी जोडले जाणार आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’पर्यंतची वाहतूक सुरळीत होणार आहे. याविषयी बोलताना  ‘ज्या व्यक्तीने (सरदार पटेल) देशाला जोडण्याचे काम केले, त्या व्यक्तीच्या प्रतिमेला देशातील वेगवेगळ्या आठ भागांना जोडले जात आहे,” असे  नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच हा क्षण माझ्यासाठी सुखद असल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.

या विशेष रेल्वेंचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याचं सांगितलं. तसेच “या रेल्वे कनेक्टिव्हीटीमुळे देशभरातून स्टॅच्यू ऑफ युनिटीला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना फायदा होणार आहे. तसेच पर्यटनाच्या संधी वाढल्यामुळे केवडीया या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनमात बदल होतील,” असे मोदी म्हणाले.