महाराष्ट्रभर सायकलने फिरून यवतमाळची तरुणी पर्यावरणाचे महत्व सांगणार

January 17,2021

अमरावती : १७ जानेवारी - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदुणामुळे होणारी निसर्गाची हानी, आरोग्य व शेतीचे नुकसान याबाबत सर्वसामान्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती करण्याचे एका तरुणीने ठरवले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील 21 वर्षीय प्रणाली चिकटे सायकलवरून महाराष्ट्रभर भ्रमंती करत लोकांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व सांगणार आहे. मागील तीन महिन्यात विदर्भातील सात जिल्ह्यात तिने भ्रमंती केली आहे. तीन हजार किलोमीटरचा प्रवास करत ती आता अमरावतीमध्ये दाखल झाली आहे. ती अमरावतीमधील लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून सांगत आहे. 

नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जाताना तिने अमरावतीत जनजागृती केली. पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड माेहीम व स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करताना विविध अनुभव आल्याचे प्रणालीने सांगितले. तिने तीन हजार किलोमीटर प्रवास केला आहे. ती रस्त्याने जाताना ज्या ठिकाणी लोकवस्ती व नागरिक आहेत त्या ठिकाणी ती जनजागृती करून तिच्या ध्येयाचे महत्त्व पटवून देत आहे. 

प्रणालीला लहानपणापासून पर्यावरण अभ्यासाची आवड आहे. आधीपासूनच पर्यावरण संवर्धन हा तिचा आवडीचा विषय आहे. परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीविषयी लोकांना महत्त्व सांगण्याचा, समस्या व कारणे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रणाली चिकटे सांगते. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणाचादेखील उद्देश आहे. महिलांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे. तीही स्वतंत्रपणे काही करू शकते, निर्णय घेऊ शकते, असेही प्रणाली सांगते.