औरंगाबाद प्रकरणात संजय राऊत यांचे रोखठोक चिमटे

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत नामांतराचा मुद्दा उफाळून येण्याची चिन्हं आहेत. भाजपाकडून वारंवार नामांतराची केली जाणारी मागणी आणि काँग्रेसकडून होणारा विरोध अशा दुहेरी कोंडीत शिवसेना अडकल्याचं चित्र आहे. औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेकडून सातत्यानं भूमिका मांडली जात आहे. “आमच्यासाठी औरंगाबाद नाही, तर संभाजीनगरच आहे, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोर देऊन सांगितलं आहे.

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की, आपल्यासाठी औरंगाबाद नव्हे, तर संभाजीनगरच आहे आणि संभाजीनगरच राहणार. हा लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण चर्चा करू शकतो, पण निर्णय घेण्यात आला आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या मागणीनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. औरंगाबाद महापालिकेची चाहूल लागल्यानं हा मुद्दा ऐरणीवर आला असून, भाजपाकडूनही या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

नामांतराला विरोध असलेल्या काँग्रेसला संजय राऊत यांनी रोखठोक सदरातूनही चिमटे काढले आहेत. “महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी व तो ते अमलात आणी. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!,” असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या कांग्रेसला टोले लगावले आहेत.