गोव्यातील ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ

January 17,2021

पणजी : १७ जानेवारी - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) केवळ केंद्र आणि गोवा सरकार यांच्यापुरता मर्यादित न ठेवता पुढील वर्षी या महोत्सवात खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेतले जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) गोव्यात सुरुवात झाली. या कार्यक्रमात जावडेकर बोलत होते.

आशिया खंडातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव अशी ‘इफ्फी’ची ओळख आहे. जावडेकर यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, ‘इफ्फी’चे संचालक चैतन्य प्रसाद, तसेच बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. इटालियन सिनेमॅटोग्राफ्र व्हिक्टोरियो स्टोरारो यांना यंदाचा ‘इफ्फी’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. आभासी पद्धतीने त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.

या महोत्सवात भारतातील १९०, तर बांगलादेशमधील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्या अतूट संबंधांचे प्रतीक असलेल्या ‘बंगबंधू’ या चित्रपटाची निर्मिती दोन्ही देश सहयोगातून करतील, असे जावडेकर यांनी या वेळी सांगितले. शेख मुजीब उर रहमान यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

सिनेमाची अनुभूती भाषेच्या पलीकडची असते आणि ‘इफ्फी’ ती अनुभवायला देते. सिनेमानिर्मितीचा उत्सव साजरा करणारे इफ्फी हे जगातील अत्यंत सशक्त व्यासपीठ आहे. त्यामुळे पुढील वर्षी ५२ व्या इफ्फीमध्ये खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेतले जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले.

प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात

यंदा ‘इफ्फी’ पहिल्यांदाच प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात होत आहे. ऑनलाइन प्रसारणासाठी ‘इफ्फी’चा स्वत:चा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. या सुविधेमुळे यंदा नेहमीपेक्षा जास्त लोक ऑनलाइन माध्यमातून महोत्सवात सहभागी होऊ  शकतील.

दरम्यान, चित्रपट निर्माते सत्यजित रे यांना अभिवादन म्हणून त्यांचे अत्यंत नावाजलेले ‘पथेर पांचाली’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘चारुलता’, ‘घरे बाइरे’ आणि ‘सोनार केला’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.