आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्याची एनआयए करणार चौकशी

January 17,2021

नवी दिल्ली : १७ जानेवारी - शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर केंद्र सरकारसोबत वाटाघाटी करणार्या संघटनांपैकी लोक भलाई इन्साफ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते बलदेवसिंग सिरसा यांना राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्देश दिला आहे. प्रतिबंधित खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसशी (एसएफजे) निगडित एका प्रकरणात त्यांची चौकशी केली जाणार आहे.

दहशतवाद निधी प्रकरणी साक्षीदार म्हणून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली. खलिस्तानी संघटना आणि त्यांच्याकडून देशातील काही स्वयंसेवी संघटनांना पाठवण्यात आलेल्या निधीचा तपास एनआयए करीत आहे. खलिस्तानी संघटनांकडून निधी प्राप्त झालेल्या स्वयंसेवी संघटनांची यादी एनआयएने तयार केली असून, या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. देशातील काही स्वयंसेवी संघटनांना निधी पुरवून एसएफजे त्यांना दहशतवादी कारवायांसाठी चिथावणी देत असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली.

अलिकडच्या काही महिन्यांत या प्रतिबंधित खलिस्तानी संघटनेने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन येथील भारतीय दूतावासासमोर निदर्शने केली आहेत. या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने १२ डिसेंबर रोजी एनआयए, अंमलबजावणी संचालनालय, आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विदेशी योगनाद नियमन विभागाची बैठक घेतल्याचे सांगितले जाते.

एसएफजे, बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान जिंदाबाद फोर्स आणि खलिस्तान टायगर फोर्स यासारख्या संघटनांच्या निधीसंबंधी चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, एसएफजेशी निगडित प्रकरणात २४ पेक्षा जास्त जणांना एनआयएने नोटिस बजावली आहे.