भारतीय जवानांनी नेहमीच प्राणांची बाजी लावली - राजनाथ सिंह

January 17,2021

नवी दिल्ली : १७ जानेवारी - लष्करामुळे आपल्या देशाचे मनोबल उंचावले आहे. चीनच्या सैनिकांसोबत गलवान खोर्यात इतका भीषण संघर्ष झाला. त्यावेळीही प्रत्येक भारतीय ताठ मानेने उभा होता. देशाची मान कधीच झुकणार नाही, यासाठी जवानांनी नेहमीच प्राणाची बाजी लावली आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी  येथे केले.

येथील न्यू कमांड रुग्णालयाच्या पायाभरणी आणि भूमिपूजन समारंभानंतर आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, पाकिस्तान आणि चीन अशा दोन आघाड्यांवरील धोका हाताळताना आपल्या सशस्त्र दलांनी, देशवासीयांना संपूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे. सीमेवर सतर्क आणि सज्ज असलेला जवान शत्रूंचे कोणतेही कुटील कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे.

भारताने कधीच आक्रमणकारी आणि विस्तारवादी धोरण जोपासले नाही. शांतता हाच सिद्धांत आहे. मात्र, कुणी आमच्यावर आक्रमण केले, तर आरपारच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

कोरोनाच्या संकट काळातही आपल्या जवानांनी मानवतेची फार मोठी मदत केली आहे. या संकटात कुणीही उपाशी राहायला नको, याची काळजी घेताना, जवानांनी गुप्तपणे गरजू लोकांपर्यंत जेवण आणि पिण्याचे पाणी पुरविले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारत-नेपाळ संबंध मजबूत करण्यास प्रचंड वाव

काही कारणांमुळे मतभेद निर्माण झाले असले, तरी भारत आणि नेपाळ संबंध मजबूत करण्यास प्रचंड वाव आहे, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी व्यक्त केला. राजनाथसिंह यांनी आज भारताच्या तीन दिवसांच्या दौर्यावर आलेले नेपाळचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रदीपकुमार ग्यावली यांची भेट घेतली. ग्यावली यांच्यासोबत परराष्ट्र व्यवहार सचिव भारत राज पौडियाल हे देखील आले आहेत. शुक्रवारी ग्यावली यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन, द्विपक्षीय मुद्यांवर सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर आज त्यांनी राजनाथसिंह यांची भेट घेतली. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांना कुठलीही मर्यादा नाही, असेही ते म्हणाले.

ते अमर्याद आहेत आणि कोणतेही मतभेद या संबंधांवर परिणाम करू शकत नाही. हे संबंध केवळ सरकारी पातळीवरील नसून, नागरिकांमध्येही आहेत. दोन्ही देशांचे नागरिक निर्भयपणे परस्परांना भेटी देत असतात, असे टि्वट राजनाथसिंह यांनी केले.

देशात कोरोनाचे संकट असताना, होळी, ईद, दिवाळी यासारखे मोठे सण भारतात कसे साजरे होतात, याकडे जगाचे लक्ष लागले होते. मात्र, नागरिकांनी संयम दाखवत आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत, हे सर्व सण घरातच साजरे केले. पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी धोक्याबाबत नागरिकांना सावध केले आणि नागरिकांनीही गांभीर्य ओळखून सरकारला सहकार्य केले, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.