काँग्रेस आणि डावे पक्ष शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहेत - प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

January 17,2021

औरंगाबाद : १७ जानेवारी - नवीन कृषी कायद्याच्या सर्मथक व्यक्तींनाच सर्वोच्च न्यायालयाने समितीत स्थान दिले आहे. तटस्थ तज्जञांची समितीत गरज होती. शेतकर्यांच्या पाठिशी कुणी नाही असे सरकारला वाटत आहे. त्यामुळे केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या आंदोलनात काँग्रेससोबतच सीपीआय, सीपीएम हे डावे पक्ष पूर्णत: अपयशी ठरले आहेत. आंदोलनात न उतरण्यासाठी या पक्षांना कोणता लकवा मारला आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. इतर पक्ष निष्क्रिय ठरल्यामुळे वंचित बहुजन आघाडी २७ जानेवारीला राज्यभर किसानबाग आंदोलन करणार असल्याचे आंबेडकर यांनी जाहीर केले. 

केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतक्र्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांना स्थगिती देत समिती स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे मुस्लिम पदाधिकारी व कार्यकर्ते २७ जानेवारीला राज्यभरात किसानबाग आंदोलन करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

दिल्लीतील शाहीनबाग आंदोलनाला शीख जथ्थ्यांनी पाठिंबा देऊन संरक्षणाची भूमिका जाहीर केली होती. आता मुस्लिम एकत्र येऊन शीख शेतकर्यांना पाठिंबा देणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. राज्यभरात दिवसभर धरणे आंदोलन होणार आहे. हा काळा कायदा रद्द करावा, शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी अशा प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनामुळे आरएसएस आणि भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल, असे आंबेडकर म्हणाले. मौलाना, मुफ्ती यांच्यासह मुस्लिम संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या पत्रकार परिषदेला राज्य प्रवक्ते अमित भुईगळ, सिद्धार्थ मोकळे, राज्य समन्वयक फारुख अहमद, शहराध्यक्ष संदीप शिरसाट, योगेश बन, प्रभाकर बकले, महिला आघाडीच्या लता बामणे आदी उपस्थित होते.