मुंडेंविरोधी आरोपांची चौकशी आठवड्यात पूर्ण करा - अनिल देशमुख यांचे आदेश

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागणार का? असा सवाल उठवण्यात आला असतानाच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबाबत पोलिसांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार आरोपांबाबतचा तपास आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. एसीपी ज्योत्स्ना रासम यांनी या संदर्भात तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार नाही असे राष्ट्रवादीने याआधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सार्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. 

धनंजय मुंडे यांच्या घरातही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून कन्या पंकजा मुंडे आणि पुतण्या धनंजय मुंडे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. आता धनंजय मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण, यावरून आतापासूनच संघर्ष पेटला आहे आणि त्याचीच धग धनंजय मुंडे यांना बसली आहे.

पैसा किंवा संपत्तीच्या वादातून हे प्रकरण चव्हाट्यावर आलेले नाही. तर मुंडेंचा राजकीय वारसदार कोण? या वादातून हे महाभारत घडल्याची माहिती समोर आली आहे. महाभारत असो, रामायण असो, नाहीतर राजेराजवाड्यांचा इतिहास. गादीच्या वारसावरून घमासान घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या करूणा शर्मा यांच्या बहिणीने म्हणजे रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचे आरोप केले आहेत. पैशांसाठी हे ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा दावा स्वत: मुंडे यांनी केला आहे. पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.