गडचिरोलीचे विद्यापीठ चंद्रपूरला हलविण्याचा कट - भाजपचा आरोप

January 17,2021

गडचिरोली : १७ जानेवारी - राज्यातच नव्हे तर देशात अतिमागास म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. ती पुसून काढण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहे. शिक्षणाशिंवाय दुसरा पर्याय नाही, ही बाब लक्षात घेऊन येथे शासनाने विद्यापीठ दिले. तेच  विद्यापीठ चंद्रपूर येथे हलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वीच या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे घेण्याचा घाट रचला जात आहे, हे खपवून घेतले जाणार नाही; प्रसंगी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा गोंडवाना विद्यापीठाचे सीनेट सदस्य तथा भाजपाचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी दिला आहे. 

गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून शासनाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाच्या निर्मितीपासून आतापर्यंत ७ दीक्षांत समारंभ यशस्वीरित्या विद्यापीठाच्या परिसरात पार पडले. या दीक्षांत समारंभांना काही कारणास्तव कुलपती उपस्थित राहू शकले नव्हते. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीक्षांत समारंभाकरिता कुलपती येणार आहेत. मात्र, तोच दीक्षांत समारंभ चंद्रपूर येथे होऊ घातल्याने हा जिल्ह्यावर अन्याय असल्याची आरोपही सारडा यांनी केला आहे. 

देशात अतिमागास जिल्हा म्हणून ओळखल्या जात असल्याने केंद्र शासनाने आकांक्षित जिल्ह्यामध्ये गडचिरोलीचा समावेश करून विकास करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातच येथे मागील दहा वर्षापासून सुरू असलेला गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर येथे त्वरीत हलविण्यात यावे, अशी मागणी चंद्रपूर येथील लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. ही मागणी करणे चुकीचे आहे. चंद्रपूरचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चंद्रपूरनेच खऱ्या अर्थाने गडचिरोलीच्या विकासासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यावर वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न केला जत आहे. 

यापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला होता. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर देऊन गडचिरोलीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे उपकेंद्र गडचिरोलीला देऊन सांत्वन करण्यात आले होते. आता तेच विदद्यापीठ परत चंद्रपूरला हलविण्यात यावे, असे चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी म्हणत आहे. हे आपण खपवून घेणार नाही. प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही गोंडवाना विद्यापीठाचे सीनेट सदस्य तथा भाजपाचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी दिला आहे.