भंडारा जळीतकांड : चौकशी समितीची चौकशी पूर्ण

January 17,2021

भंडारा : १७ जानेवारी - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील जळीतकांडाची चौकशी करणाऱ्या  समितीने आपली चौकशी पूर्ण केली असून भंडारा येथून परतली आहे. आता या समितीच्या अहवालावर जळीतकांडाची कारणमिमांसा होणार आहे.

९ जानेवारीच्या पहाटे १ ते २ वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत १0 नवजात बाळांचा होरपळून व गुदमरून मृत्यू झाला होता. १0 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली होती. तेव्हापासून ही समिती या जळीतकांडाला कारणीभूत असलेल्या बाबींची चौकशी करीत होती. चौकशी समितीने नवजात शिशु केअर कक्षासह संपूर्ण रुग्णालयातील बारीकसारीक बाबींची पाहणी केली. आठवडाभर या समितीचे काम सुरूच होते. आता या समितीने आपली चौकशी पूर्ण केली असून लवकरच अहवाल सादर करणार आहे.

या घटनेला आठवडाभराचा कालावधी लोटला आहे. घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आदींनी रुग्णालयाला भेट दिली. परंतु, अजूनही एकाही अधिकार्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. घटनेशी निगडीत सर्वच विभागांनी आपआपले हात वर केले आहेत. 'चौकशी समितीच्या अहवालानंतर जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करू,' हे एकच मुखपाठ झालेले वक्तव्य सर्वच करीत आहेत. 

दरम्यान, या जळीतकांडांची धग अजूनही कायम आहे. रुग्णालयातील दैनंदिन कामकाज अद्याप रुळावर आले नाही. डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी दहशतीत आहेत. चौकशी अहवालानंतर कोणत्या अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई होईल, ही एकच चर्चा रुग्णालयात आहे.