वर्धेत चेनस्नॅचरचा धुमाकूळ

January 13,2021

वर्धा : १३ जानेवारी - वर्धा शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात चेन स्नॅचरने चांगलाच धुमाकूळ घातला. चोरट्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अवघ्या एका तासाच्या कालावधीत तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून पोलिसांपुढे आव्हान निर्माण करणार्या आहेत.

रामनगर येथील ज्योती सराटे ( ६0वर्ष या भावाला सोडण्याकरीता जवळच्या दुकानापयर्ंत गेल्यात. भावाला सोडून घरी परत जात असताना एका दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. ही घटना सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास घडली. त्यांना काही कळायच्या आत चोरट्याने दुचाकीवर पोबारा केला. या घटनेत चोरट्याने ३0 हजारांचा ऐवज लांबविला. 

तेथून पंधरा ते वीस मिनीटांच्या कालावधीनंतर प्रतापनगरातील पुष्पा अरवींद मालते (६८) यांच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या चोरट्याने पळविली. पुष्पा मालते सायंकळी सात वाजताच्या सुमारास बाहेर फिरत होत्या. प्रतापनगरातील किराणा दुकानासमोरून जात असताना मागून आलेल्या चोरट्याने गळ्यातील सोनसाखळी चोरून पोबारा केला.चोरट्याने २0 हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. 

तिसरी घटना आर्वी नाका ते कारला चौकादरम्यान मंगल कार्यालयासमोरील भागात सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. संयोगिता विभोर मिर्शा (२७) या भाजी खरेदी करताना दुचाकीजवळ थांबल्या होत्या. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळयातील सोनसाखळी पळविली. चोरट्याने २0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एका तासातील या घटनांनी रामनगर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. वर्दळीची वेळ असताना चोरट्याने चोरी केल्याने सर्वांनाच धक्का बसला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.