आता भारतही ब्राम्ह्पुत्रेवर उभारणार जलविद्युत प्रकल्प

December 03,2020

नवी दिल्ली : ३ डिसेंबर - चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर महाकाय धरण बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अरुणाचल प्रदेशात या नदीवर धरण बांधून दहा गिगावॅटचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. चीनने ब्रह्मपुत्रावर धरण उभारल्यास भारतातील राज्यांमध्ये एकतर महापूर येऊ शकतो किंवा पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. हा विचार करून अरुणाचल प्रदेशात धरण बांधण्याचा विचार पुढे आल्याचे जल मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी टी. एस. मेहरा यांनी सांगितले.

चीनने हे धरण बांधून त्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्यास ते पाणी अडवण्यासाठी काहीना काही उपाय योजना करणे आवश्यक आहे. हे गृहित धरुन हालचाली सुरू झाल्या आहेत. हे धरण बांधले तर भारताला त्याचा दोन प्रकारे उपयोग होऊ शकतो. ईशान्येकडील राज्यांमध्ये पाणी पुरवता येईल तसेच या पाण्यावर मोठा जलविद्युत प्रकल्प राबवता येईल, असे मेहरा म्हणाले. भारत आणि चीनमधील राजनैतिक संबंध अत्यंत नाजूक वळणावर आहेत. लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून उद्भवलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील या पातळीवरच्या चर्चा बंदच आहेत. अशा स्थितीत चीनचा धरण बांधण्याचा निर्णय दोन्ही देशांमध्ये अधिक तणाव निर्माण करु शकतो. आधीच चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली आहे. आता नद्यांच्या माध्यमातून चीन आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चीन ब्रह्मपुत्रा नदीवर ६0 गिगावॅट क्षमतेचे धरण बांधणार असल्याची बातमी चीनच्या अधिकृत माध्यमांमधून सोमवारी प्रसिद्ध झाली. पॉवर कन्स्ट्रक्शन कापोर्रेशन ऑफ चायनाचे अध्यक्ष चाँग जीआँग यांनी याबाबतची घोषणा केली. ब्रह्मपुत्रा नदीवरील हे धरण चीनसाठी ऐतिहासिक संधी असल्याचे ते म्हणाले. चीनने सीमेवर कोणताही प्रकल्प राबवताना त्याचे विपरीत परिणाम भारताच्या भूभागावर होणार नाहीत याची खात्री चीनच्या अधिकार्यांकडून देण्यात येत आहे.