डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूचे गूढ आजही कायम

December 03,2020

चंद्रपूर : ३ डिसेंबर - आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शितल आमटे-करजगी यांच्या मृत्यूचे गूढ तिसर्या दिवशीही कायम आहे. मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेले लॅपटॉप, भ्रमणध्वनीतील माहिती प्राप्त करण्यास अपयश आल्याने मुंबई येथील तज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्याची माहिती वरोड्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली.

डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणाचा तपास जलदगतीने करा, असे आदेश साळवे यांनी संबंधित अधिकार्यांना दिला. मंगळवारी पोलिसांनी डॉ. शितल आमटे यांच्या खोलीतून लॅपटॉप, भ्रमणध्वनी ताब्यात घेतले होते.

पण, त्यात ‘पासवर्ड’ असल्याने ते चंद्रपूर सायबल सेलच्या पोलिस अधिकार्यांना ते उघडता आले नाही. नागपूर येथे पाठविण्यात आले. पण, तिथेही ते उघडले नाही. त्यामुळे ‘पासवर्ड’ शोधून त्यातील सत्यता तपासण्यासाठी मुंबईला पाठविण्यात आल्याचे पोलिस अधिकार्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.

 बुधवारी सकाळपासून आनंदवनात आमटे कुटुंबातील सर्वांचे बयाण नोंदविण्यात आले. त्यात दोन घर काम करणार्या मोलकरीण महिलांचाही समावेश आहे. एक-दोन महत्वपूर्ण बयाण नोंदविण्याची प्रक्रिया शिल्लक असल्याचेही तपास अधिकार्यांनी सांगितले आहे.