ताडोबात विनापरवानगी पर्यटक सोडून तिकिटाचा गैरव्यवहार करणाऱ्या वनरक्षक आणि कंत्राटदाराला अटक

December 03,2020

चंद्रपूर : ३ डिसेंबर - वाघांची राजधानी असलेल्या विदर्भातील वाघांसाठी प्रसिद्ध ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्पात येणार्या पर्यटकांना आनलाईन बुकिंग व स्पॉट बुकिंग अशी सुविधा असते. पण चिमूर तालुक्यातील नवेगाव प्रवेशद्वार येथे चक्क वनविभागाच्या वनरक्षक आणि खासगी एजंट यांनी मिळून परस्पर अधिकचे पैसे घेऊन पर्यटकांना जंगलात प्रवेश देत वनविभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे.  या प्रकरणी वनरक्षक व खासगी कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. 

कुठल्याही व्याघ्र प्रकल्पात किंवा अभयारण्यात पर्यटकांना पर्यटनासाठी जायचे असल्यास त्यांना रितसर ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे असते. बुकिंग झाल्यानंतर आवश्यक ते प्रवेश शुल्कही ऑनलाईनच भरावे लागते मात्र ताडोबाच्या नवेगाव गेटवर येथील वनरक्षक व एक खासी कंत्राटदार दोघांनी संगनमत करून येथे येणार्या पर्यटकांना थेट प्रवेश द्यायचे. यासाठी काही शुल्क आकारल्या जायचे. मात्र यातून मिळणारी रक्कम शासनाच्या तिजोरीत न जाता यांच्या खिशात जायचा. कुठल्याही प्रकारची नोंद वनविभागाला घेतली जात नव्हती. असा हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. याप्रकारामुळे वन्यप्राण्यांनाही धोका निर्माण होण्याची दाट शक्यता होती. या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष जाणार नाही, अशा पध्दतीने हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

याबाबत मंगळवारी प्रत्यक्ष एका पर्यटक पळताळणीत हा गोरखधंदा उघडकीस आल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी ताडोबा यांच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी वनरक्षक टेकचंद रूपचंद सोनुले (वय २८ वर्ष) व खासगी एजंट सचिन संतोष कोयचाडे (वय २७ वर्ष) दोघेही रा. खडसंगी यांच्याविरुद्ध अप क्र. ४२७/२0२0 कलम ४0९, ४२0, ३४ भांदविनुसार गुन्हा नोंद केला असून दोन्हीं आरोपींना अटक करण्यात आली आहे.