सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात रंगला कलगीतुरा

November 29,2020

पुणे : २९ नोव्हेंबर - कोरोना  व्हायरसवर  लस कधी येणार याची चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या लशीवरून राजकीय वाद पेटला आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये   तयार झालेल्या लशीचे आता बारामतीच्या लॅबमधून वितरण होणार आहे का? असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  यांना टोला लगावला.

पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

'पुणेकरांनी शोधलेल्या कोरोना लशीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नयेच, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'त्यांचे विधान हे फारच हास्यास्पद आहे. मला कधी कधी असं वाटतं की, आपण कोणत्या समाजात राहतोय. पुणेकरांनी लशीचा शोध लावला आहे, याला कोण नाकारत आहे. पण त्याला मॉनिटर कोण करत आहे, त्याला फायनान्स कोण करत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी कोण आले आहे. याचाही विचार करावा, म्हणजे मग बारामतीला लस निघाली असती तर प्रत्येक श्रेय तिकडेच गेले असते'

तसंच, 'कोरोनाच्या लशीवर पंतप्रधान मोदी हे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होते. लशीचे नियोजन हे केंद्र सरकार करणार आहे की सुप्रिया सुळे करणार आहे. का बारामतीतील लॅबमध्ये चालणार आहे' असा टोलाही पाटील यांनी लगावला.

'ईडीही राज्यघटनेनुसार काम करणारी संस्था आहे. पण सेनेच्या नेत्यांचा राज्य घटनेवर विश्वास नाही. जर ते दोषी नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. पण, महाराष्ट्रात सुरू असलेला आरोप प्रत्यारोपाचा खेळ लवकर संपावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे माझं शाब्दिक शेरेबाजीवरचं मत आहे आहे'