फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मराठा आरक्षण मिळवा - उदयनराजे भोसले

November 29,2020

सातारा : २९ नोव्हेंबर - देवेंद्र फडणवीस मराठा नसून त्यांनी आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देतो, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांशी चर्चा करुन काही उपयोग नाही. आधीच्या प्रश्नावर त्यांनी आधी उत्तरं द्यावी. मार्ग निघणार असेल तर चर्चा करावी, असं देखील ते म्हणाले. ते साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.  उदयनराजे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आपल्याच वयाचे आहे. त्यांनी आरक्षणासाठी काम केलं. ते आपल्याला पुढं न्यायचं आहे. आता तुम्ही सत्तेत आहात ना मग काम करा ना, असंही ते म्हणाले.

उदयनराजे म्हणाले की, जिल्हा न्यायालयातही तारीख देतात. मग सुप्रीम कोर्टाने तारीख दिली नाही. राज्य शासनाचा वकील हजर राहात नाही, असा आरोपही त्यांनी केला. इतरांना जसे आरक्षण मिळाले तसे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असं उदयनराजे म्हणाले.

आधीच्या पीढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अन्यथा फार मोठा अनर्थ होईल, याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. कुणाचं नाव घेऊन मी कुणाला मोठं करणार नाही. कारण याला सगळेच जबाबदार आहेत. लोकं यांना रस्त्यावर येऊ देणार नाही, घरात जाऊन जाब विचारतील, असंही उदयनराजे म्हणाले. मराठ्यांचा उद्रेक घडला तर त्याला हीच लोकं जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.