हैदराबादेत योगी आदित्यनाथ यांचा रोडशो

November 29,2020

हैदराबाद : २९ नोव्हेंबर - एआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या हैदराबाद शहरात  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपाचे तडफदार नेते योगी आदित्यनाथ यांनी प्रचंड रोड शो केला. यावेळी शहरात जणू भगवी लाटच उसळली होती. हैदराबादला ‘भाग्यनगर’ बनविण्यास मी येथे आलो आहे, अशी गर्जना योगींनी या वेळी केली.

 हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आले होते. शहरातील मलकाजगिरी भागात हा प्रचंड रोड शो सादर करून भाजपाने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ही आरपारची लढाई निर्धारपूर्वक लढण्याचे आवाहन यावेळी योगी आदित्यनाथ यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले. आपल्या आक्रमक भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले, मित्रांनो, एकाच कुटुंबाला जनेतच्या संपत्तीची लूट करण्याची मुभा द्यायची की, हैदराबादला पुन्हा भाग्यनगर बनवून विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे आहे याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. ही आरपारची लढाई तुम्हाला निर्धारपूर्वक लढावी लागेल.

 मला माहीत आहे की राज्य सरकार एकीकडे जनतेच्या पैशांची लूट करीत आहे, तर दुसरीकडे एआयएमच्या कारस्थानात सामील होऊन भाजपा कार्यकर्त्यांचा छळ करीत आहे. या लोकांविरुद्ध नवा संघर्ष करण्यासाठी व तुम्हाला साथ देण्यासाठी भगवान श्रीरामांच्या भूमीतून मी स्वत: येथे आलो आहे, असे प्रतिपादनही योगी आदित्यनाथ यांनी केले. 150 जागांच्या बृहद् हैदराबाद मनपाची निवडणूक 1 डिसेंबर रोजी होत आहे. यासाठी भाजपाने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली असून, असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा लहान भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांच्याविरुद्ध जबरदस्त आघाडी उघडली आहे. तेलंगणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात भाजपाने आपल्या बड्या नेत्यांना उतरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांना देखील शुक्रवारी प्रचारासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याच मालिकेत आज योगी आदित्यनाथ यांचा प्रचंड रोड शो झाला.