बडनेरा - वाशीम रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण

November 29,2020

वाशीम : २९ नोव्हेंबर - दिर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेल्या बडनेरा - वाशीम रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. सदर सर्वेक्षणानुसार या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून डिसेंबर 2020 अखेरपर्यंत रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे.आत्मनिर्भर भारत करण्यासाठी आत्मनिर्भर वाशीम जिल्हा होणे सुद्धा गरजेचा आहे. त्यासाठी बडनेरा - वाशीम रेल्वेमार्गसाठी अत्यावश्यक अशी माहिती मध्य रेल्वे नागपुर मंडळ समितीचे अध्यक्ष पद्मश्री खा.डॉ. विकास महात्मे यांनी नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वेमार्ग विस्तार कृती समितीच्या पदाधिकार्या सोबत संवाद साधतांना दिली.

पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे हे 27 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी कामरगाव, कारंजा, मंगरुळनाथ व वाशीम येथे नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वेमार्ग विस्तार कृती समितीच्या पदाधिकार्या सोबत संवाद साधला. यावेळी बोलतांना डॉ. महात्मे म्हणाले, वाशीम जिल्हा अनुशेष आणि अवर्षण क्षेत्रात मोडत असल्याने शेतीसाठी सिंचनाच्या मुबलक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योग धंदे उभारल्या शिवाय पर्याय नाही. जिल्ह्याचा उद्योगाच्या माध्यमातून विकास व्हावा या करिता शासनाने जिल्ह्यात जवळपास 300 हेक्टर जमीन एमआयडीसीसाठी संपादित केली; परंतु उद्योगासाठी आवश्यक दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे अपेक्षित उद्योग सुरु होवू शकले नाहीत. त्यासाठी हा रेल्वे मार्ग होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने सन 2015 मध्ये मागासलेल्या व अविकसीत जिल्ह्याचा विकास करण्याचे धोरण निश्चीत केले आहे.

 रेल्वेने सन 2016-17 मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले होते. आता सर्वेक्षण पुर्ण होवून प्रस्ताव तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालय यांना सादर होणार आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी या रेल्वे मार्गाची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरावी, असे आवाहन देखील डॉ. महात्मे यांनी केले.