अहंकार बाळगून रसिकांचा अपमान करणे हा मोठा अपराध - सुधाकर गायधनी

November 25,2020

नागपूर : २५ नोव्हेंबर - अहंकार सुंदर असेल तर ताजमहल बनतो आणि अहंकार कुरूप असेल तर बीवी का मकबरा बनतो. अहंकार मनात बाळगून कवीने रसिकांचा अपमान करणे हा फार मोठा अपराध आहे, असे मनोगत महाकवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले.

कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भाच्या विकासासाठी भरीव कार्य करणार्या किंवा विदर्भाचा लौकिक वाढविणार्या व्यक्तीस 'विदर्भ गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. २0२0 चा 'विदर्भ गौरव पुरस्कार' मराठी कवितेच्या जगात लक्षणीय काव्य रचणारे महाकवी सुधाकर गायधनी यांना प्रदान करण्यात आला. मनोगतात त्यांनी कवितेचा आशय आणि कवितेतील प्रतिमा याबद्दल भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके होते. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. एक लाख रु. रोख आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कवितेला सुंदर बनविण्यासाठी कवितेचा आशय आणि कवितेतील प्रतिमा एक सुंदर कलाकृती घडवित असते. पण, नेमका येथेच धोका होऊ शकतो. खरेतर कवितेतील प्रतिमांनी कवितेच्या आशयाला स्वत:पेक्षा अधिक सुंदर करून रसिकांपुढे पेश करायचे असते. बरेचदा तसे होत नाही. प्रतिमांच्या विळख्यात कवितेचा आशय कुठेतरी गडप होतो आणि उरते फक्त आत्मा नसलेली कलाकृती. सुंदर मात्र, पूर्णपणे निजिर्व. कविता ही सहज शब्दातून व्यक्त होऊन रसिकांच्या मनात घर करणारी असावी लागते. पण, अनेक कवितांच्या बाबतीत मात्र असे होत नाही. अनेक कवींच्या कवितांचे आशय समजायला समीक्षक आपली अनेक वर्षे खर्ची करतात. बरेचदा ज्याला जो वाटेल तो अर्थ ते लावत सुटतात. जी कविता अनाकलनीय आणि आत्मीय आहे त्याला समीक्षक उगाच अर्थ लावत बसतात. यामुळे त्या कवींची विशेष लोकांत गणना झाली असली तरी रसिकांच्या मनात अशा कवींना घर बनविता येत नाही, असे यावेळी गायधनी यांनी स्पष्ट केले. कवी हा अभिव्यक्त कलावंत तर रसिक हा अव्यक्त कलावंत असतो. कविता ही संवादाची कला आहे आणि नेमका कवितेतून संवादच खुंटत चालला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाड्मयातून, कलेतून कचरा निर्मितीचा प्रयास सुरू आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांनी यावेळी व्यक्त केली. 

सध्याच्या काळात कवितेसमोर 'क्राईसेस' निर्माण झाले आहेत. कवितेचे बळच हरवत चालले आहे. कोणीही कवितेच्या नावावर काहीही लिहित आणि फेसबुक अथवा इतर माध्यमांवर टाकून मोकळे होतात. त्यांना 'वाह क्या बात है' एवढी दाद त्यांचेच लोक देतात आणि कविता हा विषय तेथेच संपतो. लोकांना रूचते म्हणून बरेच लोक काहीही थिल्लर कविता रचतात आणि सादर करतात. यामुळे मनात वादळ निर्माण करायची कवितेची ताकतच संपत चालली आहे, असेही कनाटे यांनी संगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. सूत्रसंचालन रेखा दंडिगे यांनी केले.