आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हॉटेलला केला साडेतीन लाखाचा दंड

November 25,2020

अमरावती : २५ नोव्हेंबर - कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात संचारबंदी आदेशाद्वारे लग्नाव्यतिरिक्त इतर सभा-समारंभांना प्रतिबंध केलेला असतानाही येथील एका हॉटेलमध्ये गर्दीत सभा झाल्याचे आचारसंहिता भरारी पथकाला निदर्शनास आल्यावरून या हॉटेलला साडेतीन लाख रुपए दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.आचारसंहिता भरारी पथकाच्या अहवालावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ही नोटीस जारी केली. संचारबंदी आदेशानुसार लग्नसमारंभाव्यतिरिक्त इतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. तथापि, हॉटेल महफिल इन येथे ७00 व्यक्तींच्या उपस्थितीत सभा झाल्याचे आचारसंहिता भरारी पथकाला निदर्शनास आले.प्रतिबंध असतानाही अशी सभा किंवा समारंभ आयोजित केल्याचे प्रथम आढळल्यास प्रतिव्यक्ती पाचशे रुपए दंडाची तरतूद आहे. या सभेला ७00 व्यक्ती उपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याने साडेतीन लाख रुपए दंडाची नोटीस हॉटेल संचालकाला बजावण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा-२00५ चे कलम ५१ ते ६0, भारतीय साथरोग अधिनियम १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, भारतीय दंडसंहिता १८६0 चे कलम १८८ व इतर संबंधित कायदे व नियमअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे.या दंडाच्या रकमेचा भरणा सात दिवसाच्या आत करून घेऊन तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, यापुढे असे झाल्याचे आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा हॉटेलचालकाला देण्यात आला आहे.