आशीष देशमुख यांचा काँग्रेसला घरचा अहेर

November 21,2020

वाढीव वीज देयकावरून भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सरकारला धारेवर धरले आहे. भाजप व मनसेनंतर आता विदर्भातील काँग्रेसने सरकारला शॉक द्यावा, असे आवाहन करीत काँग्रेसचे नेते व काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी राज्य सरकारला घरचा अहेर दिला आहे.

वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचे घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,वित्तमंत्री यांनी दिलासा देणे शक्य नव्हते तर वीजबिल सवलतीची घोषणा का केली, असा सवाल डॉ. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. वाढीवबिलात दिवाळीपूर्वी सवलत देऊ, असे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते. परंतु आता सरकारने जनतेला ठेंगा दाखवला आहे. वीजबिलात कोणतीही सवलत मिळणार नाही. खरे तर ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफी व सवलतीसाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु त्यांना हवा तसा पाठिंबा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांकडून मिळाला नाही. काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे विदर्भातील काँग्रेसने जनतेच्या हितासाठी सरकारला शॉक देण्याची तयारी ठेवावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.