कांद्याची दरवाढ प्रकरणी बच्चू कडूंची आक्रमक भूमिका

October 29,2020

अमरावती : २९ ऑक्टोबर - कांद्याचे दराने जोरदार उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कांदा साठवणुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे तुरी दरामध्ये घसरण होऊ लागली आहे. या दोन्ही मुद्द्यावरून आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळायला लागले की लगेच निर्यातबंदी होते. शेतमालाच्या साठवणुकीवर बंधन आणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीवर पुन्हा काठी चालवण्या सारखे असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली. तसेच कांदा दरवाढीचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समर्थन केले पाहिजे, असा सल्लाही राज्यमंत्री बच्चू यांनी दिला आहे.

यावर्षी कांदा उत्पन्नात कमालीची घट झाल्याने व बाजारपेठेत कांद्याची आवकही घटल्याने मागील एक महिन्यापासून कांद्याचे दर हे तेजीने वाढत आहेत. कांद्याचे वाढते दर लक्षात घेता शासनाच्या वतीने आदेश काढून कांदा साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना केवळ २५ टन एवढाच कांदा साठवणूक करता येणार आहे. परंतु या निर्णयाचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. छोट्या मोठ्या व्यापाऱ्याने २५ टन कांदा साठवणूक केला तर उर्वरित कांदा शेतकऱ्यांनी फेकून द्यावा का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

तूर डाळ व तुरीच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीवर देखील त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, हे स्पष्ट झाले आहे. जशी तूर १३ हजार रुपये प्रति क्विंटल वर गेली तसेच तुरीच्या निर्यातीवर बंदी घातली आणि आयात सुरू केली. त्यानंतर आता डाळ ११० रुपये किलोच्या वर विकता येणार नाही आणि तुरीची साठवणूकही करता येणार नाही, असा निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे हे सरकार कलम कसाई ची औलाद आहे, अशी जहरी टीका बच्चु कडू यांनी केली.