भंडारा जिल्ह्यात पकडली १०० पेट्या देशी दारू

October 29,2020

भंडारा : २९ ऑक्टोबर - पवनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील भुयार येथून अवैधरित्या देशी दारूविक्री करण्यासाठी दारू बंदी असलेल्या जिल्ह्य़ात जात असल्याची गुप्त माहिती मिळताच स्कार्पिओसह १00 पेटी देशी दारू पवनी पोलीस पथकाने जप्त केली. ही कारवाई रात्री १ ते २ च्या दरम्यान करण्यात आली. सदर कारवाई पोलिस अधीक्षक वसंत जाधव व उपविभागीय पोलिस अधिकारी जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी केली.

आरोपी अनिल अशोक कोवे (२६) रा. तळोधी, अनिकेत अरविंद कोहपरे (२२) रा.ब्रम्हपुरी, उमेश कृष्णराव निरंगूळवार (४५) रा. मुरखंडा, श्रीहरी विनायक रासेकर (२३) रा. भागडी, त्रिपाल दिनकर लांजेवार (१९) रा. मांगली, अतुल श्रीकृष्ण हिंगे (२४) रा. ढिवरवाडा यांना अटक करण्यात आली. 

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदीमुळे लगतच्या भंडारा नागपूर या सीमेवर असलेल्या जिल्ह्यातून अवैध दारूचा पुरवठा होत असतांना शांतता व सुव्यवस्थेची वाट लागली आहे. अनेक बेरोजगार तरुण कमी वेळात भरपूर पैसा मिळतो म्हणून अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात सहभागी असतांना भुयार येथे केलेल्या कारवाईमुळे सदर व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. 

पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांना गुप्त माहिती मिळताच पोलीस कर्मचार्यांचे पथक भुयार येथे तळ ठोकून बसले असता समोरून येणार्या स्कॉर्पिओ एम. एच. ३१ सी. एस. ५६६८ वाहनाची तपासणी केली असता १00 बॉक्स अवैध देशी दारू मिळाल्याने आरोपींना मुद्देमालासह अटक केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील, सत्यराव हेमणे, बुरडे, तिडके, योगेश राऊत उपस्थित होते.