सीसीआयने कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरु करावे - खा. भावना गवळी

October 29,2020

वाशीम : २९ ऑक्टोबर - दिवाळी पंधरा दिवसावर आली असतांनाही कापसाची खरेदी सुरु झालेली नाही. राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत असल्यामुळे त्यांच्या जवळचा कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केन्द्र सरकारकडे केली आहे.

कोरोनामुळे सामान्य जनताच नव्हे तर शेतकरी सुध्दा अडचणीत आहे. नैसर्गीक संकटामुळे शेतकरी आर्थीकदृष्ट्या संकटात सापडला आहे. या वर्षी परतीच्या पावसामुळे कापसाची वाताहात झाली. हजारो शेतकर्यांचा कापूस पावसामुळे काळवंडला असून, कोटयवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परीस्थितीत समोर येणारे सण तसेच रब्बी हंगाम बघता शेतक-यांचा कापूस खरेदी करणे गरजेचे आहे. सध्या तरी कापूस खरेदी साठी फक्त नोंदणी केली जात आहे. कापसाची खरेदी दिवाळी नंतर सुरु होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी तात्काळ सीसीआय ची खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

 विशेष म्हणजे नुकतीच मुंबई येथे कापूस पणन महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत ज्या ठिकाणी सीसीआय ची खरेदी केन्द्र असतील त्याठिकाणी पणन महासंघाची खरेदी केंद्र देण्यात येणार नसल्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर राज्यात फक्त 30 ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे एवढे कमी खरेदी केन्द्र असतील तर व्यापारी शेतकर्यांची लुट केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सीसीआय तसेच पणन महासंघाची पर्याप्त खरेदी केंद्र दिवाळी पुर्वी सुरु करण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी केली आहे.