मास्क न लावणा-या २८५ नागरिकांकडून दंड वसूली

October 28,2020

नागपूर : २८ ऑक्टोबर -  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी बुधवारी (२८ ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार २८५ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ४२ हजार ५०० रुपयांचा  दंड  वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १५२३३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ५९,७५,५००/- चा दंड वसूल केला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नसताना अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे.