नोकरीचे आमिष दाखवून केला अत्याचार

October 28,2020

नागपूर : २८ ऑक्टोबर - नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. 

आरोपी संजय देवतळे हा पीडित मुलीच्या भावजींसोबत (बहिणीचे पती)  होता. आरोपीने तिला नोकरी लावून देतो असे सांगून तिच्याकडून मोबाईल नंबर प्राप्त केला. त्यानंतर आरोपीने मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तिने नकार दिला तेव्हा आरोपीने तुझ्या जिजाजींना कामावरून काढून टाकणार अशी धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले  एवढेच नाही तर तिला विश्वासात घेऊन तिच्याजवळच दागिनेही घेतले. दागिन्यांची मागणी केली असता तुझ्या ताईला जिवाने मारून टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली.