प्रियकराने फसवलेल्या गर्भवती तरुणीची आत्महत्या

October 28,2020

नागपूर : २८ ऑक्टोबर - एका १९ वर्षीय युवतीला आपल्या प्रेमजल्यात ओढले नंतर लग्नाचे आमिष देऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार  केला. दरम्यान, तिला गर्भ राहिला असता तो मी नव्हेच अशी भूमिका प्रियकराने घेतली शेवटी स्वतः सह आई-वडिलांच्या बदनामीच्या भीतीपोटी युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

ही घटना वाठोडा परिसरातील आहे. प्रीती (बदललेले नाव) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीत ही पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. तिचे वडील खासगी काम करतात तर आई गृहिणी आहे. वस्तीत राहणाऱ्या एकीचे युवकाशी तिची मैत्री होती. त्याच्यासोबत चॅटिंग करताना ती त्याच्या प्रेमात पडली. दोघांच्याही वारंवार भेटी होऊ लागल्या. त्यांचे प्रेमप्रकरण वस्तीत पोहोचले. त्यामुळे प्रियकराने तिला लग्न करण्याचे आमिष दिले. तिचा पूर्ण विश्वास त्याच्यावर बसला. तिच्या घरी कुणी नसताना तो तिच्या घरी येऊ लागला. लग्न करणार असे वाचन दिल्यामुळे त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. प्रीतीला तो स्वतःच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यातूनच ती गर्भवती राहिली. सुरुवातीला ती गोंधळात पडली. घाबरलेल्या अवस्थेत तिने प्रियकराला फोन केला आणि गर्भवती असल्याची माहिती दिली. त्याने लगेच हात झटकत तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. त्यामुळे ती खचली. आता आईवडील आणि आपली समाजात बदनामी होईल, अशी भीती तिच्या मनात होती. त्यामुळे तिने थेट आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला. सोमवारी सायंकाळी घरी कुणी  नसताना प्रितीने घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तिच्या प्रियकराचा शोध घेणे सुरु आहे. तसेच तिने लिहिलेली सुसाईड नोट किंवा तिच्या मोबाईलमधील चॅटिंगवरून तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे.