नागपुरातील ग्रंथालये आता उघडली

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली ग्रंथालये, अभ्यासिका गुरुवारी सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी भौतिक दुरतेसह शासन नियमांचे पालन करून वाचकांना ग्रंथालयात प्रवेश देण्यात आला.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 22 मार्चपासून शहर, जिल्ह्यातील खाजगी, सार्वजनिक ग्रंथालये बंद करण्यात आली होती. कोरोना काळात टीव्ही पाहण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. शहरात अबकड अशी वर्गवारी असणारी सुमारे 500 हून अधिक ग्रंथालये आहेत. कोरोनामुळे ग्रंथालये, अभ्यसिका बंद असल्याने सात महिने वाचकांसह, विविध परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना त्रास झाला. दोन दिवस अगोदर ग्रंथालये, अभ्यसिकांच्या स्वच्छतेबरोबर निर्जंतुकीकरण करण्यात आले. शासनाने माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ग्रंथालये सुरू केली. ग्रंथालयात येताना मुखाच्छादन, विषाणूनाशक द्रव वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्रंथालयात येणार्‍या प्रत्येक वाचकाचें धर्मल स्क्रनिंग केले जात आहे. ग्रंथालये सुरू झाल्याने वाचक पुस्तके नेण्यासाठी ग्रंथालयात येत होते.