फडणवीस - राऊत भेटीचा राजकीय अर्थ काढू नका - शरद पवार

September 30,2020

पंढरपूर : ३० सप्टेंबर - शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा मध्यावधी निवडणुकीचा दावा फेटाळून लावला. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असे  ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी भेटीवर बोलताना सांगितले की, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. संजय राऊत यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळीच त्यांनी इतर पक्षांच्या नेत्याच्या मुलाखती घेणार असे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचे कारण नाही. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील असा दावा केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचे जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली, असल्याचे म्हटले. यावर बोलताना शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे खंडन केले. राज्यात मध्यावधीची शक्यता नाही असे ते म्हणाले आहेत. 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले व संभाजीराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सणसणीत टोला हाणला. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा खोचक सल्ला पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शरद पवारांनी मराठा आरक्षण, संजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेट व सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरील प्रश्नांना उत्तरे दिली.