तपास करताना पोलिसांसमोर आव्हान, रहस्य आणि रोमांचही - अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद

September 30,2020

नागपूर : ३० सप्टेंबर - घटनेचा तपास करताना पोलिसांना चांगले, वाईट दोन्ही अनुभव येतात. त्यात आव्हानांसोबतच रहस्य आणि रोमांचही असते. सत्य घटनांवर आधारित माझ्या पुस्तकातील पात्र काल्पनिक नाही तर वास्तविकता दर्शविणाऱ्या  सामान्य पोलिसांचे आहे, असे प्रतिपादन तुरुंग व सुधारसेवा विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी केले.

नागपूर पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘कॉप्स इन अ क्वॅगमायर या पुस्तकाचे प्रकाशन  पत्रकार क्लबमध्ये करण्यात आले. पुस्तकासंदर्भात माहिती देताना रामानंद बोलत होते.

शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक व अतिरिक्त पोलिस महासंचालक सुनील रामानंद, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने आणि पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते.

 या पुस्तकाविषयी सांगण्यापूर्वी रामानंद यांनी आगामी पुस्तकासंदर्भात माहिती दिली. या पुस्तकात आत्मसमर्पण केलेल्या नक्षली महिलेची कथा आहे. अंगाचा थरकाप उडविणारी ही सत्य घटना आहे, असेही ते म्हणाले.

 ‘कॉप्स इन अ क्वॅगमायरङ्क या पुस्तकाविषयी बोलताना सुनील रामानंद म्हणाले, ग्रामीण भागातील एका सराफा दुकानात घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा तपास करताना पोलिसांची दमछाक होते. राजकीय व सामाजिक आरोपानंतर तपासकरिता विशेष पथक नेमले जाते. विशेष पथकाने प्रकरणाचा छडा लावल्यावर प्रत्येक आरोपीला अटक होते. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त केला जातो. पण, ही घटना इथवरच थांबत नाही.

 तपासादरम्यान एका महिलेचा मृत्यू होतो. यासाठी पोलिसांना जबाबदार धरण्यात येते. या परिस्थितीत पोलिसांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, हे त्यांचे त्यांनाच माहित. पोलिसांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात येतो. पुढे काय झाले, हे पुस्तक वाचल्यावरच कळेल. हे अनुभव कुठेही येणार नाहीत. ते केवळ सेवा देणाèया पोलिसांनाच येतात. त्याच अनुभवांची पुस्तकात मांडणी करण्यात आली, असेही रामानंद यावेळी म्हणाले. संचालन अजय पाटील यांनी केले.

नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याना आधीच वेळ नाही. त्यांना स्वतःचे छंद जोपासता येत नाहीत. अशाही स्थितीत एक पुस्तक लिहिणे आव्हानात्मक आहे. वेळ मिळाला की पुस्तक लिहिण्यात तो घालवायचा. थोडे थोडे करून हे पुस्तक रामानंद यांनी पूर्ण केले. रामानंद यांचे ‘कॉप्स इन अ क्वॅगमायरङ्क हे पुस्तक अतिशय सुंदर आणि वाचनिय असून त्यांनी ते लिहिण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल सात वर्षे लागली. भविष्यात त्यांची इतर पुस्तके लवकर प्रकाशित होतील, अशी अपेक्षा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली.