चांगूलपणाची चळवळ, कोरोनाकाळात सातत्य जपणारा ऑनलाईन प्रबोधन यज्ञ

September 30,2020

मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे भारतातील जनजीवन विस्कळीत व्हायला सुरुवात झाली. परिणामी अनेकांची रोजी-रोटी बंद झाली. त्याचबरोबर अनेक काम करणारी माणसं घरातच अडकली. जशी शारीरिक भूक तशीच बौद्धिक भूक ही देखील महत्त्वाची असते. अशावेळी या देशातील अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे सज्जन धावून आले. कोणी गरजूंची पोटाची भूक कशी भागवता येईल याचा विचार करून कृती करायला सुरुवात केली. कोणी घरात बसलेल्यांना बौद्धिक खाद्य कसे पुरवता येईल याचे नियोजन करुन ते राबवले. मात्र या दोन्ही गरजा भागवण्यासाठी धडपड करणारी एक व्यक्ती नागपुरात होती, ही व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध महिला उद्योजिका सौ. अरुणा पुरोहित. 

अरुणा पुरोहित या नागपुरातील, नव्हे महाराष्ट्रातील आघाडीच्या महिला व्यावसायिक आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणार्‍या त्या एक कार्यकर्त्याही आहेत. नागपुरात लॉ कॉलेज चौकात असलेले त्यांचे सर्वात जुने  हॉलमार्क गिफ्ट शॉपी, वर्धा रोडवर असलेले सुसज्ज असे हॉटेेल शॅलेज, चंद्रपुरात घनकचरा व्यवस्थापन करणारी समाधान वेस्ट मॅनेजमेंट ही कंपनी या तीन प्रमुख व्यवस्थापनांसोबत त्यांचे पती सचिन पुरोहित यांच्या बांधकाम व्यवसायातही अरुणा पुरोहित सक्रिय आहेत. या उद्योगांच्या माध्यमातून अरुणा  पुरोहितांनी ४५० गरजूंना रोजगार दिला आहे.  याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणारी सेंटर फॉर डेव्हल्पमेंट ही संस्था, गोरगरिबांना हात देणारी अन्नक्षेत्र फाऊंडेशन ही संघटना  तसेच महिला उत्थानासाठी कार्यरत असलेली वेणी फाऊंडेशन ही संघटना, रोटरी, भारत विकास परिषद,महिलांच्या स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणारी सिल्व्हर एज युथोपियन ही संघटना  अशा विविध संघटनांच्या माध्यमातून समाजसेवा करणार्‍या अरुणा  पुरोहित या राष्ट्र सेविका समितीच्याही सक्रिय सेविका आहेत. 

लॉकडाऊन सुरु होताच आजूबाजूची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे अरुणाच्या लक्षात आले. त्यांनी अन्नक्षेत्र फाऊंडेशनच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. नागपूर शहरातील घरकाम करुन घर चालवणार्‍या मजूर महिला, ज्यांची रोजी-रोटी बंद झाले असे कामगार या सर्वांचा शोध घेत अशा व्यक्तींना धान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू इत्यादी सामान अन्नक्षेत्र फाऊंडेशनच्या माध्यमातून पोहचवायला सुरुवात झाली. या काळात शहरात ठिकठिकाणी क्वॉरंटाईन सेंटर सुरु झाले होते. या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असलेल्या  लहान मुलांसह मोठ्या रुग्णांनाही  सोयामिल्क,  एनर्जी बिस्किट, प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ  इत्यादी पोहचवायलाही त्यांनी सुरुवात केली. रस्त्यावर दिवसरात्र पहारा देणारे पोलिस, सफाई कामगार तसेच रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स आणि परिचारिका यांच्याकडेही अरुणा पुरोहितांचे लक्ष गेले. त्यांनाही सोयामिल्क बिस्किटे पोषक द्रव्ये असणारे खाद्यपदार्थ प्रतिकार क्षमता वाढवणारी औषधे इत्यादींचे वाटप अरुणाजींनी अन्नक्षेत्र फाऊंडेशनच्या माध्यमातून केले. त्यांच्या या कार्याची दखल महानगरपालिका आणि विविध शासकीय संस्थानाही घेऊन त्यांचे कौतुक केले. 

याच काळात देशात हजारो मजूर आणि त्यांचे परिवार स्थलांतरित होत होते. त्यातील अनेक जण पायीच जात होते. अरुणा पुरोहितांनी अन्नक्षेत्र च्या मदतीने नागपूर शहराच्या चारही बाजूने जाणाऱ्या रस्त्यांवरून स्थलांतरित होत असलेल्या मजुरांना अन्न,पाणी, औषधे इत्यादी पुरवण्यासाठी धावपळ केली याच काळात श्रमिक ट्रेन्स मधूनही मजूर जात होते. नागपूर रेल्वे स्थानकावर महापालिकेच्या मदतीने या श्रमिक ट्रेन्स मधून जाणाऱ्या प्रवाश्यानाही वरील सर्व सुविधा अन्नक्षेत्र ने पुरविल्या. 

शारीरिक भूक भागवण्याबरोबरच बौद्धिक भूक भागविणे हे देखील गरजेचे असल्याचे अरुणाजींच्या लक्षात आले. लॉकडाऊनमुळे अनेक कर्ती माणसं घरात अडकली होती. त्यांना दिवसभर करायचे काय हा प्रश्‍न होता. अशांना काहीतरी बौद्धिक खाद्य पुरवणे गरजेचे होते. ते बौद्धिक खाद्यही अशा घरी रिकाम्या बसलेल्या व्यक्तींच्या मनात चांगूलपणा रुजवणारे असावे हेही आवश्यक होते. त्यातूनच काही समविचारी मंडळींशी चर्चा करायला त्यांनी सुरुवात केली. या चर्चेत त्यांचेच कौटुंबिक स्नेही असलेले भारताचे निवृत्त परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय मानवता आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यातूनच चांगूलपणाची चळवळ ही संकल्पना पुढे आली. ज्ञानेश्‍वर मुळेंचे ज्ञानेश्‍वर मुळे फाऊंडेशन आणि अरुणा पुरोहितांचे अन्नक्षेत्र फाऊंडेशन एकत्र येत एक नवा उपक्रम सुरु झाला. 

चांगूलपणाची चळवळ या बॅनरखाली दररोज फेसबूकच्या माध्यमातून एक तास मान्यवर व्यक्तीसोबत जनसामान्यांनाचा संपर्क करुन द्यायचा असे निश्‍चित झाले. मे 2020 च्या तिसर्‍या आठवड्यात या उपक्रमाला सुरुवात झाली. दररोज एक व्यक्ती या पद्धतीने नियोजन करून दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत 135 मान्यवरांशी संवाद घडवून आणण्याचा चांगूलपणा अरुणा पुरोहितांनी दाखवला आहे. 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत या उपक्रमाचे 150 भाग होतील. म्हणजेच दररोज सातत्य कायम ठेवून 150 मान्यवर व्यक्तींना जनसामान्यांपर्यंत समाज माध्यमांच्याद्वारे पोहचवण्याचे काम अरुणाताईंनी यशस्वी पार पाडलेले असेल. हा उपक्रम असाच पुढे नेऊन 365 दिवस सातत्याने चालवण्याचा अरुणा पुरोहित आणि त्यांच्या सहकार्‍यांचा निर्धार आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ. मुळे यांच्या उद्बोधनाने झाली. पहिल्या दिवशी डॉ. मुळे यांनी देशाच्या संविधानाबाबत माहिती देत नागरिकांच्या शंका दूर केल्या. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर या उपक्रमात जोडले गेेले. त्यात सर्वच होते. नितीन गडकरी, रामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार असे राजकारणी होते. लक्ष्मीकांत देशमुख, विश्‍वास पाटील असे साहित्यिक होते. मंदार फणसे , दिलीप चव्हाण, अजित द्विवेदी (पत्रकार), शमसुद्दीन तांबोळी (मुस्लिम सुधारक), सुबोध भावे (अभिनेता), अभिजित देशमुख (क्रिकेटपंच), हनुमंतराव गायकवाड (उद्योगपती), भूषण कोवळेकर (बँकर), सुमंत टेकाडे (इतिहासकार), विश्‍वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते), ज्योतिका कालरा (मानवाधिकार कार्यकर्त्या) आनंद पाटील (ज्येष्ठ सनदी अधिकारी), सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री), विष्णू मनोहर (मास्टर शेफ) अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद या चांगूलपणाच्या चळवळीत त्यांनी घडवून आणला. हा लेख लिहित असताना त्यांचे 13५ कार्यक्रम झालेले आहेत. पुढील काही दिवसात भारतीय लष्करातील विक्रांत मोरे, नृत्यांगना आश्‍विनी काळसेकर, राजकीय क्षेत्रातील देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, युवक चळवळीतील क्रांती शहा,  जेरील बानाईत, मिलिंद थत्ते, बँकिंग क्षेत्रातील किशोर खरात अशा अनेक मान्यवरांना त्या या माध्यमातून बोलके करणार आहेत. 

हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 5 वाजता सुरु होतो. या कार्यक्रमात मान्यवरांना बोलके करण्याचे काम यशवंत शितोळे (कोल्हापूर) हे करतात. सुमारे 45 मिनिटे उद्बोधन झाल्यावर 10-15 मिनिटे प्रेक्षकांकडून आलेल्या प्रश्‍नांची उत्तरेही दिली जातात. या उपक्रमाला सुरुवात झाली तेव्हा सुमारे 5 हजार व्यक्ती पहिल्याच दिवशी जोडल्या गेल्या होत्या. आता दररोज किमान 25 हजार व्यक्ती कार्यक्रमाच्या वेळी फेसबूकला जोडलेल्या असतात. याशिवाय नंतर फेसबूक पेजवर जाऊन किंवा यूट्यूब लिंक ओपन करुन बघणारेही अनेक असतात त्यामुळे आज ही चांगूलपणाची चळवळ चांगलीच फोफावली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

सुरुवातीला फेसबुक लाइव्हवर  मोजक्याच  लोकांचा प्रतिसाद होता मात्र, दुसऱ्याच दिवशी हा प्रतिसाद वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या ३५ जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय फेसबुक ग्रुप आणि व्हाट्सअँप ग्रुप तयार केले गेले. दररोज या ग्रुप्सला जुळणाऱ्या  इच्छुकांची संख्या चक्रवाढ दराने वाढते आहे. या माध्यमातून जुळणारे लोक विविध अधिकाऱ्यांकडे आपल्या समस्या पोहोचवण्यासाठी डॉ. मुळे आणि  अरुणा पुरोहित यांच्याकडे आग्रह धरतात. अशा समस्यांचाही पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक तो चांगुलपणा आयोजक दाखवतात. एकूणच या छोट्याश्या उपक्रमाचे आता विशाल स्वरूप तयार झाले आहे. त्यातून प्रबोधन तर होतेच पण समस्यांचे निराकरणही होते. 

या चळवळीची मूळ संकल्पना डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची असली तरी त्याला मूर्त रूप देण्यासाठी महत्वाचा हातभार लावला आहे तो अरुणा पुरोहित यांनी. त्याचबरोबर ऊर्जा फाउंडेशनचे यशवंत शितोळे यांनीही सिंहाचा वाटा उचलला आहे. याचबरोबर  शुभांगी  मुळे, शैला काम्बरे, पारस ओसवाल, प्रतिभा शिंगारे, अनिल नानिवडेकर, उज्वला  जाधव, रघुवीर राठोड, डॉ. सुचेता उथनानी , उत्कर्ष फडणीस व डायगो या सर्वच कार्यकर्त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्यासाठी जोर लावला आहे.  

"जे जे आपणास ठावे, ते ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळजन" असे संतांनी सांगितलेले आहे. आपल्याला माहित असलेले इतरांना सांगण्यासाठी अनेक जाणकार उत्सुक असतात मात्र त्यांना इतरांपर्यंत पोहचण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नसते. अरुणा पुरोहित यांनी डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या आश्‍वासक मार्गदर्शनात ही चळवळ उभारण्याचा चांगूलपणा दाखवला आणि अशा जाणकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचाही संकल्प हाती घेतला. हा संकल्प त्यांनी सातत्याने पुढे चालवला आहे. 

एका अर्थाने त्यांनी सुरु केलेला हा प्रबोधन यज्ञच म्हणावा लागेल. त्यांच्या या धडपडीतून भारतीय जनमानसाचे प्रबोधन होईल यात कोणाच्याही मनात शंका नसावी.

चांगूलपणाची चळवळ या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक ऊर्जा फाउंडेशनचे http://www.facebook.com/urjawelfarefoundation/live  या फेसबूक पेजवर जाऊन सहभागी होऊ शकतात. 

तसेच झालेले कार्यक्रम ऐकण्यासाठी- http://www.facebook.com/urjawelfarefoundation/videos यावर  क्लीक करून ऐकू शकतात.

अधिक माहितीसाठी अरुणा  पुरोहित यांना ९०९६०७७९९९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.  

                                                                                                                                                            अविनाश पाठक